**प्रतिकूल परिस्थितीवर मात! बार्शी तालुक्यातील विद्या काळेची पोलीस भरतीत देदीप्यमान यश**
विद्याचे वडील दत्तात्रय काळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते संसार चालवण्यासाठी छोटासा मंडप व्यवसाय करतात. आई वंदना काळे द्राक्ष विक्रीचे कष्टप्रद काम करतात. घरची आर्थिक स्थिती बेताची असतानाही पालकांनी लेकीच्या शिक्षणात आणि पोलीस बनण्याच्या स्वप्नात कधीही अडथळा आणला नाही. आई-वडिलांचे राबणारे जीवन पाहून विद्याने अभ्यास आणि मैदानी चाचणीत पूर्ण मेहनत घेतली.
**शिक्षणाचा प्रवास**
विद्याने प्राथमिक शिक्षण गुळपोळी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात झाले. ११वी-१२वी अॅड. दिलीपराव सोपल विद्यालय, सुर्डी येथे केले. उच्च शिक्षणासाठी बार्शीतील शिवाजी कॉलेजमधून बी.एससी. पदवी घेतली. पोलीस भरतीची तयारी तिने बार्शीतील शौर्या करिअर अकॅडमी (अजित कोळी सर) आणि शिवराज फिजिकल अकॅडमी (विशाल कौलगे सर) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ग्रामीण भागातील सुविधांच्या अभावातही केवळ चिकाटीच्या जोरावर तिने यश मिळवले.
विद्या म्हणाली, “आई द्राक्ष विकून आणि वडील शेतात राबून कष्ट करतात. त्यांचे हे कष्ट पाहूनच मला प्रेरणा मिळाली. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच आज मी खाकी वर्दी घालू शकले. गुरूंच्या मार्गदर्शनालाही मी कायम कृतज्ञ राहीन.”
विद्याचा हा संघर्ष ग्रामीण भागातील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे तिने दाखवून दिले. गुळपोळी ग्रामस्थांनी तिच्या यशाचे कौतुक करताना सामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने गावाचा गौरव वाढवल्याचे सांगितले. महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या