**बीड : एसीबीचा एकाच दिवशी ‘डबल’ धमाका; तलाठी व ग्रामसेवक लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**
**बीड : एसीबीचा एकाच दिवशी ‘डबल’ धमाका; तलाठी व ग्रामसेवक लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी बीड, ता. ९ एप्रिल : जिल्ह्यातील महसूल व ग्रामविकास विभागात भ्रष्टाचाराच्या तक्रारींना आज एसीबीने ठोस पुष्टी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (८ एप्रिल) एकाच दिवशी दोन धडाकेबाज कारवाया करत एक तलाठी व एक ग्रामसेवक यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या दोन्ही घटनांमुळे महसूल व ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.
**पहिली कारवाई : केज तालुक्यातील तलाठी जाळ्यात**
केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (४७) याला एसीबीने ९ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. वारसा हक्क प्रमाणपत्र (७/१२ उताऱ्यात वारस नोंद) काढून देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे प्रथम ३९ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांवर सौदा झाला. यातील ९ हजार रुपये कामापूर्वी घेण्याचे ठरले होते. तलाठी कार्यालयाबाहेरच एसीबी पथकाने सापळा रचला. जाधव हे माजी सैनिक असून, निवृत्तीनंतर अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच तलाठी पदावर रुजू झाले होते. ही कारवाई एसीबी उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या पथकाने पार पाडली.
**दुसरी कारवाई : परळी तालुक्यातील ग्रामसेवक जेरबंद**
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) दशरथ देविदासराव गोरे याला एसीबीने ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. जलसिंचन विहिरीच्या कुशल बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. पंचायत समिती कार्यालय परिसरात मागणी झाल्यानंतर गोरे यांच्या खासगी कार्यालयात ५०० रुपये स्वीकारताना ते रंगेहात पकडले गेले. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक समाधान कवडे यांच्या पथकाने केली.
दोन्ही कारवायांमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साध्या कामांसाठीही लाचेची मागणी होत असल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. एसीबीने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याने लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या