**अंजनगाव खेलोबा : शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटांत तणाव; रास्ता रोकोमुळे माढा-मोहोळ मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प**
**अंजनगाव खेलोबा : शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटांत तणाव; रास्ता रोकोमुळे माढा-मोहोळ मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प**
**KDM NEWS प्रतिनिधी माढा ** माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेवरून गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावामुळे परिस्थिती चिघळली आहे. दोन गटांमध्ये आमने-सामने झाल्याने बुधवारी रात्री दगडफेकीची घटना घडली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे गावात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, माढा-मोहोळ मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
गावातील खेलोबा मंदिराजवळ पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून शिवभक्त आणि दुसऱ्या एका गटात (मंदिर ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थ) वाद निर्माण झाला. एका गटाचा दावा आहे की, पुतळ्यासाठी निवडलेली जागा मंदिर ट्रस्टच्या मालकीची असून, तिथे पुतळा बसवणे योग्य नाही. दुसऱ्या गटाने पुतळा बसवला. यामुळे बुधवारी रात्री दोन्ही गट आमने-सामने आले. दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला. त्यानंतर गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.
गुरुवारी सकाळपासून रस्ता रोको सुरू असल्याने माढा-मोहोळ मार्गावरून जाणारी सर्व बस व खासगी वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. यामुळे शेकडो प्रवासी अडकले. पोलिस अधीक्षकांनी गेल्या दोन दिवसांत गावात भेट घेतली. त्यांनी दोन्ही गटातील प्रतिनिधींसोबत बैठक घेत मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या गावात शेकडो पोलिस जवान तैनात आहेत. विशेषतः खेलोबा मंदिराच्या चारही बाजूंना सुरक्षा वाढवण्यात आली असून, आत शंभर ते दीडशे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुतळा प्रकरणात लक्ष घालण्यासाठी गावात येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मराठा समाजाच्या काही घटकांनी याला विरोध दर्शवला. पोलिसांनी हाके व त्यांच्या सहकाऱ्यांना पंढरपूरजवळ अडवले. यामुळे परिस्थिती आणखी ताणली गेली. सध्या दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरू असून, पोलिस शांतता राखण्यासाठी सतर्क आहेत.
पोलिस प्रशासनाने दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे. मध्यस्थी यशस्वी झाल्यास रस्ता रोको मागे घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सध्याची परिस्थिती अद्याप तणावपूर्ण असल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम कायम आहे. स्थानिक ग्रामस्थ व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यात सतत चर्चा सुरू असून, लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या