**अंजनगाव खे .मंदिरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन**

**अंजनगाव खे. मंदिरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन** 

**KDM NEWS प्रतिनिधी माढा (सोलापूर), ३ एप्रिल २०२६** – सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील जागृत देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून मराठा आणि धनगर समाजात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक धनगर समाजाने पुतळा हटवण्याची मागणी केली असून, मराठा समाजाने त्याला विरोध दर्शवला आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

प्रकरणाची माहिती अशी: तीन आठवड्यांपूर्वी दत्तात्रेय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाल यांनी ग्रामपंचायतीकडे पुतळा बसवण्यासाठी परवानगी मागितली होती. ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आणि पोलिसांना कळवले. तरीही रात्री अपरात्री पुतळा बसवण्यात आला. मंदिर समिती आणि मुख्य पुजारी राजाभाऊ वाघमोडे महाराज यांचे म्हणणे आहे की, ही जागा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर येते आणि धार्मिक विधींना अडथळा निर्माण होतो. ते म्हणाले, “खेलोबा देवाप्रमाणेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कुलदैवत मानतो. पण जागा मंदिराच्या आवारात असल्याने पुतळा इतरत्र हलवावा, आम्ही सहकार्य करू.”

धनगर समाजाचे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी गावात ठिय्या मांडला आहे. त्यांनी पुतळा सन्मानाने हटवून शासन जागेत किंवा देणाऱ्यांच्या जागेत उभा करा आणि तेथे शिवसृष्टी उभारावी, अशी मागणी केली. हाके म्हणाले, “पुतळ्याच्या आडून धनगर समाजाला टार्गेट करण्याचा डाव आहे. यामागील हेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करावी. आमदार अभिजीत पाटील यांनी पुतळा हटवणे रोखले.”

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही बाजूंची भेट घेतली. बुधवारी पुतळा हटवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा दगडफेक आणि लाठीचार्ज झाला. गुरुवारी जमीन मोजणीचे प्रयत्न झाले, पण मंदिर समितीने नोटीसशिवाय परवानगी नाकारली. सध्या गावात १७० पोलिस कर्मचारी, दंगली नियंत्रण पथके आणि सशस्त्र पथके तैनात आहेत. तणाव कायम असल्याने गावाबाहेरच्या नागरिकांना प्रवेश नाकारला गेला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात दोन्ही समाजांना हात जोडून विनंती केली आहे. ते म्हणाले, “मराठा आणि धनगर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक डाव रचत आहे का? पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा हा कोणाचा प्रयत्न आहे? आपण सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. दोन्ही समाज माझे आहेत. शांततेने बसून तोडगा काढू. कोणाचीही भडक प्रतिक्रिया यशस्वी होऊ देऊ नका.”

जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी प्रकरणाची पूर्ण माहिती घेणार असल्याचे सांगितले. “अंजनगावचा दौरा करायचा की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण आज संध्याकाळी मी सर्व प्रकार जाणून घेईन. धनगर आणि मराठा बांधवांनी शांतता राखावी, आपण एकत्र बसून मार्ग काढू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या गावात शांतता राखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दोन्ही समाजांनी संवादातून तोडगा काढावा, असे आवाहन सर्व स्तरांवरून केले जात आहे. प्रकरण अद्याप निकाली निघालेले नाही. जमीन मोजणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल