**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारला सोलापूरचा पदभार!**

**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारला सोलापूरचा पदभार!** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**सोलापूर, दि. ३ एप्रिल : राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा नवा फेरा सुरू केला असून सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली असून कार्तिकेयन यांनी आज सोलापूरचा पदभार स्वीकारला आहे.

कुमार आशीर्वाद हे २०१६ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी यशस्वी कारभार केला होता. आता त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातील नागपूर येथे बदली झाली असून ते डॉ. बिपीन इटणकर यांच्याकडून पदभार घेतील.

नवीन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे २०२० बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. जन्म १८ एप्रिल १९९१, मूळ तामिळनाडू. मद्रास विद्यापीठातून बी.कॉम (अकाउंटन्सी) ही पदवी घेतलेले कार्तिकेयन सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत. यापूर्वी त्यांनी नांदेड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी व एसडीओ म्हणून काम केले आहे. मार्च २०२४ पासून ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासन, महसूल व जमीन व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांचा विशेष अनुभव आहे.

ही बदली राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या सलग बदल्यांचा भाग आहे. सोलापूर जिल्ह्यातील विकास प्रकल्प, महसूल प्रशासन व जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या कामात नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाला अधिक गतिमान करण्याचे संकेत दिले आहेत.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल