**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धडाका; चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधीची तोडफोड**
**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धडाका; चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधीची तोडफोड**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कव्हे गावातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावठाण क्षेत्रातील स्मशानभूमीजवळ दिवसाढवळ्या अवैध मुरूम उपसा सुरू आहे , यात चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या स्मृती असलेल्या समाधीची तोडफोड करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
समाधीची तोडफोड: धार्मिक भावनांशी खेळ
कव्हे येथील गावठाण जागेत अनेक वर्षांपासून **चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या समाधी** आहेत. मात्र, मुरूम माफियांच्या हापापलेपणाने या समाधींची तोडफोड करून त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोल उत्खनन केले आहे. आपल्या पूर्वजांच्या खुणा पुसल्या जात असल्याचे पाहून समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेचे विद्रुपीकरण होत असल्याने स्थानिकांच्या धार्मिक भावनांना मोठा तडा गेला आहे.
महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत 'मूकदर्शक'
मिळालेल्या माहितीनुसार, हे उत्खनन महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकाखाली सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, "वरचेवर" असलेले लागेबांधे आणि राजकीय पाठबळामुळेच हा प्रकार बिनदिक्कत सुरू असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. माफियांकडून jcb ट्रॅक्टरद्वारे मुरूम बाहेर काढला जात असून, शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली जात आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांना धमक्या
अवैध उत्खननामुळे गावठाणची जमीन खचू लागली परिसरातील भूजल पातळीवरही परिणाम झाला आहे. या बेकायदेशीर कामाला विरोध करणाऱ्या सामान्य नागरिकांना माफियां कडून धमकावण्यात येत असल्याचे समजते. "प्रशासन आमचेच आहे, तुम्ही काय करणार?" अशा अविर्भावात हे माफिया वावरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
**नागरिकांच्या प्रमुख मागण्या:**
* **तातडीने कारवाई:** चर्मकार समाजाच्या समाधीची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्खनन तात्काळ थांबवावे.
* **यंत्रसामग्री जप्ती:** अवैध कामात वापरण्यात येणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करावेत.
* **निलंबनाची कारवाई:** या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची चौकशी व्हावी.
* **महसूल वसुली:** आजवर काढलेल्या मुरुमाचा पंचनामा करून लाखो रुपयांचा दंड वसूल करावा.
**"गावठाण आणि स्मशानभूमीची जागा सुरक्षित राहिली पाहिजे. आमच्या पूर्वजांच्या समाधी तोडणाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालू नये. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू."**
*स्थानिक चर्मकार समाज ग्रामस्थ, कव्हे*
आता या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक लक्ष देऊन कव्हे येथील या 'मुरूम राज'ला लगाम घालणार का? याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या