**अंजनगाव खेलोबा : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला; खेलोबा मंदिराच्या जागेतून स्थलांतराचा एकमताने निर्णय**
**अंजनगाव खे. : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला; खेलोबा मंदिराच्या जागेतून स्थलांतराचा एकमताने निर्णय**
**KDM NEWS प्रतिनिधी माढा**सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे निर्माण झालेला तीन दिवसांचा तणाव अखेर मिटला आहे. ग्रामस्थांच्या दोन्ही गटांनी शुक्रवारी रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुवर्णमध्य काढला. पुतळा बसवलेली जागा खेलोबा देवस्थानची असल्याचे दोन्ही समाजाने मान्य केले असून, पुतळ्याचे दुसऱ्या योग्य जागी स्थलांतर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
वादाची पार्श्वभूमी अशी : काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी शिवभक्तांनी खेलोबा मंदिराजवळ पुतळा बसवला. यावर धनगर समाजाने आक्षेप घेतला. त्यांचा दावा होता की ही जागा मंदिर परिसरातील आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले, दगडफेक झाली आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारे, नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत मराठा समाज आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी सहभागी होते. माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंनी चर्चा केली.
**बैठकीत काय ठरलं?**
- पुतळा बसवलेली जागा खेलोबा देवस्थानच्या ४५ गुठ्ठे क्षेत्रात येत असल्याचे दोन्ही गटांनी एकमताने मान्य केले.
- पुतळा सन्मानजनक रीतीने काढून दुसऱ्या योग्य जागी बसवण्याचा निर्णय झाला.
- दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवीन जागेची शोध घेतील आणि प्रशासनाच्या मदतीने पुतळ्याचे स्थलांतर करतील.
- गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, तणाव पूर्णपणे निवळला आहे.
या तोडग्यामुळे गावातील दोन्ही समाजांमध्ये समन्वयाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनानेही दोन्ही बाजूंना सहकार्याचे आश्वासन दिले आहे. हा निर्णय शिवभक्त आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी समाधानकारक ठरला असल्याचे प्रतिक्रिया उमटत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या