**अकुलगाव शिवारात पाण्याच्या वादात नातेवाईकाकडून मारहाण; महिलेच्या मनगटावर काठीचा मार, पतीला धमकी**

**अकुलगाव शिवारात पाण्याच्या वादात नातेवाईकाकडून मारहाण; महिलेच्या मनगटावर काठीचा मार, पतीला धमकी** 

**KDM NEWS प्रतिनिधी माढा (सोलापूर), १० एप्रिल २०२६ :** माढा तालुक्यातील अकुलगाव शिवारातील सामाईक शेती गट क्रमांक ३२७ येथे ऊस पाण्यासाठी सामाईक विहिरीवर झालेल्या वादात नातेवाईक प्रणय कानिफनाथ घोडके याने फिर्यादी महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर लाकडी काठीने मारून जखमी केले. त्याचबरोबर प्रणयच्या वडिलांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजता घडली.

फिर्यादी सौ. अनुजा बापूसाहेब घोडके (वय ३२, रा. अकुलगाव, ता. माढा) यांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी जबाबात सांगितले की, त्यांचे कुटुंब (पती बापूसाहेब, सासू रसिका, मुलगा विराज व मुलगी इश्वरी) एकत्र राहते. शेती गट क्र. ३२७ मधील १० एकर शेतीची वहिवाट त्यांच्याकडे आहे. या शेतीसाठी सामाईक विहिरीचे पाणी आळीपाळीने वापरले जाते.

दि. ९ एप्रिलला दुपारी ३.४५ वाजता अनुजा विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेल्या असता प्रणय कानिफनाथ घोडके याने मोटरची फ्यूज काढून ठेवली होती. त्याबाबत विचारणा केली असता प्रणयने वाद घालून शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. त्यावेळी अनुजाचे पती बापूसाहेब घटनास्थळी आले. त्यांनी फ्यूजबाबत विचारले असता प्रणयने हातातील लाकडी काठीने बापूसाहेब यांना मारण्याचा प्रयत्न केला. अनुजा यांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रणयने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर काठीने जोरात मारहाण केली.

त्याचवेळी प्रणयचे वडील कानिफनाथ घोडके येथे आले. त्यांनी बापूसाहेब यांना हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली आणि “परत विहिरीवर आलात तर जीवे मारू” अशी धमकी दिली. दोघे नंतर तेथून निघून गेले.

अनुजा व बापूसाहेब यांनी तक्रार देण्यासाठी थेट माढा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कुईवाडी येथे पाठवले. उपचारानंतर अनुजा यांनी प्रणय कानिफनाथ घोडके व कानिफनाथ घोडके यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल