**बार्शी तालुक्यातील कुसळंब शिवारात स्कूटरवरून देवदर्शनावरून परत येणाऱ्या दांपत्याकडून १.१० लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावले**
**बार्शी तालुक्यातील कुसळंब शिवारात स्कूटरवरून देवदर्शनावरून परत येणाऱ्या दांपत्याकडून १.१० लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावले**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, बार्शी : ५ एप्रिल २०२६** बार्शी तालुक्यातील कुसळंब गावाच्या शिवारात रोडच्या लगत पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी रात्री ९ वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन एका दांपत्याकडून १.१० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने झपाट्यात हिसकावून नेले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०४(२) व ३(५) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत अशोक मुंढे (वय २९, व्यवसाय : वैद्यकीय दुकान) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते व त्यांची पत्नी साक्षी मुंढे हे येडाई देवी येरमाळा (जि. धाराशिव) येथील देवीच्या दर्शनासाठी स्कूटरने गेले होते. दर्शन घेऊन रात्री ९ वाजता ते कुसळंब गावाजवळ पोहोचले असताना मागून काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर बसलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक हल्ला केला.
मोटार सायकल चालविणाऱ्या इसमाने प्रशांत यांच्या अंगावर थुंकल्याने ते गाडी थांबवून विचारणा करत असतानाच, मागे बसलेल्या इसमाने झपाट्यात साक्षी मुंढे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण (१५ ग्रॅम, ६ काळे मणी, किंमत ७५,००० रुपये) व डाव्या कानातील सोन्याचे गुंड (२ ग्रॅम, किंमत १०,००० रुपये) हिसकावले. त्याचवेळी चालकाने प्रशांत यांच्या उजव्या हाताच्या चौथ्या बोटातील सोन्याची अंगठी (५ ग्रॅम, किंमत २५,००० रुपये) काढून घेतली.
झटापटीत प्रशांत यांच्या डाव्या हाताला व तोंडाला मुक्के मारले गेले. चोरटे शेतातील कच्च्या रस्त्याने पांगरीच्या दिशेने पळून गेले. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर त्यांनी सासरे दयानंद बाबू जाधवर, चुलत सासरे बालाजी बाबू जाधवर व चुलते मुकुंद रंगनाथ मुंढे यांना फोनवरुन घटनेची माहिती दिली.
फिर्यादी प्रशांत मुंढे हे मुळचे कळंबवाडी (ता. बार्शी) येथील रहिवासी असून सध्या बार्शीतील राऊत चाळ, दत्त नगर येथे राहतात. त्यांचे कुटुंब मेडिकल दुकान चालवून उपजीविका चालवते.
पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजता माहिती मिळाल्यानंतर ५ एप्रिल रोजी रात्री १२.४८ वाजता एफआयआर नोंदविण्यात आला. आरोपी दोघेही अज्ञात असून, फिर्यादीने त्यांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो, असे सांगितले आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची तपासणी सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या