**पुण्यात बालविवाहाचा पर्दाफाश: १७ वर्षीय मुलीचे २८ वर्षांच्या तरुणाशी लावले लग्न; ५ जणांवर गुन्हा दाखल**
**पुण्यात बालविवाहाचा पर्दाफाश: १७ वर्षीय मुलीचे २८ वर्षांच्या तरुणाशी लावले लग्न; ५ जणांवर गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी वैराग:**बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी होत असतानाही पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी भागातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील एका २८ वर्षीय तरुणाशी लावून दिल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वाती सुभाष पथाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
**नेमकी घटना काय?**
मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर (बिबवेवाडी) येथील रहिवासी असलेल्या राजनंदिनी (नाव बदललेले, वय १७) या बालिकेचा विवाह **५ डिसेंबर २०२५** रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील **संगमनेर** येथे लावून देण्यात आला होता. चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) ला या विवाहाबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला आदेश दिले होते.
**अशी झाली कारवाई**
दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सहायक बालविवाह प्रतिबंध अधिकारी स्वाती पथाडे, समुपदेशक सुरेखा कांबळे, केस वर्कर मोनिका जाधव आणि अंगणवाडी सेविका लक्ष्मी महाले यांच्या पथकाने मुलीच्या घरी भेट दिली. यावेळी ती मुलगी विवाहित अवस्थेत (गळ्यात मंगळसूत्र धारण केलेले) मिळून आली.
मुलीच्या आईकडे चौकशी केली असता, नळदुर्ग येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असताना नातेवाईकांनी सुचवलेल्या स्थळाशी मुलीचा विवाह निश्चित करण्यात आला आणि संगमनेर (बार्शी) येथे घराच्या दारातच हा विवाह सोहळा पार पडला, अशी कबुली पालकांनी दिली.
**वयाचा पुरावा ठरला निर्णायक**
तपास पथकाने मुलीच्या वयाची खात्री करण्यासाठी जन्म दाखल्याची पडताळणी केली. सरकारी कागदपत्रांनुसार आणि अंगणवाडीतील जन्म-मृत्यू नोंदवहीनुसार मुलीचा जन्म **२८ डिसेंबर २००९** रोजी झाला आहे. लग्नाच्या वेळी मुलीचे वय केवळ १६ वर्षे १० महिने होते, जे कायद्यानुसार विवाहयोग्य (१८ वर्षे) नाही.
**यांच्यावर झाला गुन्हा दाखल**
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये पोलिसांनी खालील व्यक्तींवर गुन्हा नोंदवला आहे:
१. **सुवर्णा चुंगे** (मुलीची आई, वय ४१, रा. बिबवेवाडी)
२. **बालाजी चुंगे** (मुलीचे वडील, वय ४५, व्यवसाय- मंडप कॉन्ट्रॅक्टर)
३. **अभिमन्यू खं
पाटील** (वर/मुलगा, वय २८, रा. बार्शी, सोलापूर)
४. **खंडेराव पाटील** (मुलाचे वडील, रा. बार्शी)
५. **सुरेखा पाटील** (मुलाची आई, रा. बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
**प्रशासनाचा इशारा:**
बालविवाह करणे, त्यात सहभागी होणे किंवा प्रोत्साहन देणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या