**अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा अडकली; पोलीस तपासात ४०-५० कोटींच्या आर्थिक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर**
**अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा अडकली; पोलीस तपासात ४०-५० कोटींच्या आर्थिक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर**
**KDM NEWS प्रतिनिधी नाशिक : नाशिकच्या भोंदू ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या बहिणीचा थेट संबंध उघडकीस आला आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांच्या दोन बँक खात्यांमधून खरातने २०२१ ते २०२५ या काळात लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. एका खात्यातून तर ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
खरात हा सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांच्या जगदंब सहकारी पतसंस्थेत आणि अहमदनगरच्या अरविंद बावके यांच्या समता सहकारी पतसंस्थेत वारसदार (नॉमिनी) म्हणून नोंदलेला होता. या दोन्ही पतसंस्थांतील खात्यांमधून खरातने स्वतः ५० आणि ४८ असे एकूण ९८ आर्थिक व्यवहार केले. या दोन्ही संस्थांमधून खरातने एकूण १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रतिभा चाकणकर यांची दोन खातीही याच पतसंस्थांतील आहेत आणि त्यांच्यामार्फत खरातने मोठ्या प्रमाणात पैसे फिरवल्याचे आढळले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार खरातने जवळच्या लोकांच्या आधार कार्ड, पॅन कार्डचा वापर करून अनेक खाती उघडली आणि त्यातून आर्थिक फसवणूक केली. तो दहावी पास असूनही श्रद्धेच्या नावाखाली लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून शेकडो कोटींची मालमत्ता कमावली. महिलांवर लैंगिक अत्याचार, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि धमकी अशा गंभीर आरोपांखाली नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल आहेत. सध्या एका प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत तर दुसऱ्या प्रकरणात पोलिस कोठडीत आहे. एसआयटीने त्याची १३ दिवसांपासून सखोल चौकशी सुरू ठेवली आहे.
रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी अशोक खरातशी कोणताही आर्थिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या बहिणीच्या खात्यांमधील व्यवहारामुळे चाकणकर कुटुंबीयांची अडचण वाढली आहे. प्रतिभा चाकणकर सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. एसआयटीने या प्रकरणात ४५ नेत्यांशी खरातचे संबंध तपासले असून त्यातील काही नेत्यांवरही आर्थिक फसवणुकीचे संशय व्यक्त केले जात आहेत. खरातने चार मोबाइल नंबरचा वापर करून नेत्यांशी, जमीन खरेदी-विक्रीसाठी आणि भक्तांशी संपर्क ठेवला होता.
सद्यस्थितीत प्रतिभा चाकणकर यांना अटक झालेली नाही, मात्र त्यांच्या खात्यांतील व्यवहारामुळे एसआयटीची चौकशी त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांचीही चौकशी सुरू आहे. प्रकरणात जमीन फसवणुकीचेही एफआयआर दाखल झाले असून तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या