**पाणी मागितले अन् गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले! उंबरगेत अनोळखी चोरट्याची दहशत**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**उंबरगे (सोलापूर) :** बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील जाधव वस्तीवर आज सकाळी ९.३० वाजता अनोळखी चोरट्याने एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३४,००० रुपयांचे सोन्याचे काळे मण्याचे गंठण हिसकावून नेले.
पीडित सुशिला रामहारी विधाते (वय ५६, हिंदू मराठा, व्यवसाय : घरकाम व शेती) यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, सकाळी स्वयंपाक आटोपल्यानंतर त्या घरासमोर भांडी धुण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी इसम पिवळ्या रंगाच्या टँकी असलेल्या मोटारसायकलवरून आला. त्याने गाडी नारळाच्या झाडाखाली उभी करून त्या दोघांना गहू-तांदूळ विचारले. सुशिलाताईंनी “आमच्याकडे काही नाही” असे सांगितल्यावर त्याने पाणी मागितले. त्या हौदाकडे नळाची टोपी दाखवून आत जाण्यास निघाल्या, तेव्हा त्याने पाठीमागून येऊन तिला धक्का देऊन गळ्यातील मंगळसूत्र व काळ्या मण्यांचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला.
सुशिलाताईंनी दोन्ही हातांनी गळा घट्ट धरला, तरी चोरट्याने काळ्या मण्यांचे गंठण जबरदस्तीने ओढून काढले. त्यात ५ ग्रॅम सोन्याच्या कांड्या, २ ग्रॅमचे सोन्याचे खरबुजे मणी व १.५ ग्रॅमचे सोन्याचे डोरले होते. एकूण किंमत ३४,००० रुपये. चोरटा मोटारसायकलवर स्वार होऊन उंबरगे गावाच्या दिशेने जोरात पळून गेला.
आरडाओरडा ऐकून वस्तीतील लोक जमा झाले. त्यांनी चोरट्याची मोटारसायकल उंबरगेकडे निघून गेल्याचे पाहिले. सुशिलाताईंनी सांगितले की, “तो इसम पुन्हा दिसला तर मी त्याला ओळखू शकते.”
पीडित सुशिला रामहारी विधाते यांचा पती रामहारी शेती व मजुरी करतात. मुलगा गुणवंत शिक्षक असून तो माडग्याळ (ता. जत, जि. सांगली) येथे कुटुंबासह राहतो. घटनेची नोंद बार्शी पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या