**बार्शी : दागिन्यांच्या लोभातून ७३ वर्षीय घरमालकिणीचा निर्घृण खून; भाडेकरूने लिंबू सरबतात झोपेच्या गोळ्या मिसळून टॉवेलने गळा दाबला**
**बार्शी : दागिन्यांच्या लोभातून ७३ वर्षीय घरमालकिणीचा निर्घृण खून; भाडेकरूने लिंबू सरबतात झोपेच्या गोळ्या मिसळून टॉवेलने गळा दाबला**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने कर्जबाजारी झालेल्या जुन्या भाडेकरूने आपल्या ७३ वर्षीय घरमालकिणीला दागिन्यांच्या लोभापोटी थंड डोक्याने खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी शहरातील हांडे गल्ली येथे उघडकीस आली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे प्रकरण खुनात रूपांतरित झाले असून, आरोपीने पोलिसांसमोर आणि फिर्यादीसमोर पूर्ण कबुली दिली आहे.
गंगुबाई कालीदास गडदे (वय ७३, रा. हांडे गल्ली, कचेरी रोड, बार्शी) या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मालकीच्या वाड्यातील खोलीत दीर्घकाळ भाडेकरू म्हणून राहणारा चांगदेव गोवर्धन पाटील (वय ३५, मूळ रा. हत्तीज, ता. बार्शी; सध्या पवार बिल्डिंग, शिवाजीनगर, डॉ. खामकर हॉस्पिटलवरील दुसरा मजला) याने २५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते १.३० च्या दरम्यान हा गुन्हा केला.
फिर्यादी शशिकांत किसन वायकुळे (वय ६४, रा. उपळाई रोड, बार्शी) यांच्या तक्रारीनुसार, गंगुबाईंचा मोबाईल २५ मार्चपासून स्विच ऑफ होता. २७ मार्च रोजी घराला कुलूप लागलेले दिसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली. भाडेकरू महेश जामदारे, चंद्रकांत सांगळे यांनी सांगितले की, २५ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास गंगुबाई घराला कुलूप लावून निघून गेल्या. त्यानंतर शशिकांत यांनी मुलगा अजय वायकुळे, चंद्रकांत सांगळे, आश्राम वायकुळे व पूर्व भाडेकरू चांगदेवसह बार्शी शहर पोलीस ठाण्यात मानव हरवल्याची तक्रार (क्र. ४२/२०२६) दाखल केली होती. तपास पोलीस नाईक प्रदीप पायघन यांच्याकडे होता.
२९ मार्च रोजी घरासमोरील हार्डवेअर दुकानदार अमोल नागणे यांनी सांगितले की, २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता चांगदेव गंगुबाईंच्या घरी आला होता. त्यानंतर गंगुबाई कुलूप लावून गेल्या. पोलिसांनी चांगदेवला बोलावले असता तो मंगळवेढा येथे असल्याचे सांगून टाळाटाळ केली. ३० मार्च रोजी चांगदेवने पोलिसांना फोन करून येत असल्याचे सांगितले, पण आला नाही. त्यामुळे संशय बळावला.
पोलिसांसह फिर्यादीने पवार बिल्डिंग डॉ. खामकर हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. डॉ. खामकर यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता चांगदेव क्रेडिट कार्ड हरवल्याचे कारण सांगून फुटेज पाहू लागला आणि त्यानंतर सर्व डेटा डिलीट झाला. त्याच दिवशी बार्शी मेडिकलच्या सीसीटीव्हीमध्ये २५ मार्च दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान गंगुबाई पिवळ्या साडी घालून चांगदेवच्या मागोमाग पवार बिल्डिंगमध्ये आत जाताना दिसल्या. परंतु बाहेर येताना दिसल्या नाहीत.
३० मार्च रोजी चांगदेवचा मोबाईल (८८०५०५४१८४) स्विच ऑफ होता. त्याचे घर व मूळ गाव हत्तीज येथे शोध घेतला, पण तो मिळाला नाही. २ एप्रिल २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक कुंजीर यांनी शशिकांत यांना फोन करून ठाण्यात बोलावले. तेथे चांगदेव हजर होता. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने समोरासमोर कबुली दिली की, शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्याने पैशाची गरज होती. गंगुबाईंच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, गळ्यातील डोरले, कानातील सोन्याचे वेल व फुले पाहून लोभ बसला. त्याने २५ मार्च रोजी दुपारी १२ ते १.३० च्या दरम्यान गंगुबाईंना आपल्या खोलीत बोलावले. लिंबू सरबतात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. बेशुद्ध झाल्यावर टॉवेलने नाक दाबून खून केला. मृतदेहाची खात्री झाल्यावर घरातील काळपट रंगाच्या पोत्यात भरून हुंडई वेरना कार (एमएच २० सीएस ८९३७) च्या डिकीमध्ये ठेवून नेला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली.
चांगदेवच्या कबुलीवरून फिर्यादी व साक्षीदारांना खात्री पटली. त्याच्या वागण्यावरून खुनाची खात्री झाली. बार्शी शहर पोलीस ठाण्यात चांगदेव गोवर्धन पाटील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.
ही घटना बार्शी परिसरात खळबळ माजवून गेली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गंगुबाईंचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या