**बार्शी हादरली! शेअर मार्केटमधील नुकसानीमुळे घरमालकिणीचा खून; माजी भाडेकरूने मृतदेह ट्रंकेत भरून लावली विल्हेवाट**
**बार्शी हादरली! शेअर मार्केटमधील नुकसानीमुळे घरमालकिणीचा खून; माजी भाडेकरूने मृतदेह ट्रंकेत भरून लावली विल्हेवाट**
**KDM NEWS बार्शी | प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी आणि कर्जाचा डोंगर उपसण्यासाठी एका माजी भाडेकरूने आपल्या ७३ वर्षीय वृद्ध घरमालकिणीचा सोन्याच्या दागिन्यांसाठी निघृण खून केल्याची थरारक घटना बार्शीत उघडकीस आली आहे. आरोपीने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ट्रंकेत भरून स्वतःच्या कारमधून नेऊन त्याची विल्हेवाट लावली. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मयत गंगुबाई कालिदास गडदे (वय ७३, रा. हांडे गल्ली, कचेरी रोड) या घरात एकट्याच राहत होत्या. आरोपी चांगदेव गोवर्धन पाटील (मूळ रा. हत्तीज, सध्या रा. शिवाजीनगर, बार्शी) हा त्यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाल्याने चांगदेव कर्जबाजारी झाला होता. गंगुबाई नेहमी सोन्याचे दागिने अंगावर परिधान करायच्या, हे त्याला माहित होते. याच दागिन्यांच्या लालसेपोटी त्याने २५ मार्च २०२६ रोजी गंगुबाईंच्या खुनाचा कट रचला.
असा रचला खुनाचा कट
* विश्वासघात: २५ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास चांगदेवने गंगुबाईंना विश्वासात घेऊन आपल्या शिवाजीनगर येथील खोलीवर बोलावले.
* अमानुष कृत्य: त्याने त्यांना पिण्यास लिंबू सरबत दिले, ज्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. गंगुबाई बेशुद्ध होताच त्याने नाकावर टॉवेल दाबून त्यांचा श्वास रोखला आणि अत्यंत थंड डोक्याने त्यांचा खून केला.
* विल्हेवाट: खुनानंतर त्याने अंगावरील सोन्याचे दागिने (पाटल्या, डोरले, वेल, फुले) काढून घेतले आणि मृतदेह एका काळपट रंगाच्या ट्रंकेत (लोखंडी पेटीत) कोंडला. त्यानंतर स्वतःच्या 'हुंदाई व्हर्ना' कारमधून (MH 20 CS 8937) ही पेटी डिक्कीत ठेवून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
तपासाचे चक्र फिरले आणि आरोपी जाळ्यात अडकला
गंगुबाई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बार्शी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासात खालील महत्त्वाचे दुवे समोर आले:
१. दुकानदाराची साक्ष: परिसरातील एका हार्डवेअर दुकानदाराने पोलिसांनी माहिती दिली की, बेपत्ता होण्यापूर्वी चांगदेव गंगुबाईंना भेटला होता.
२. CCTV फुटेज: पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता, २५ मार्च रोजी गंगुबाई चांगदेवच्या इमारतीत जाताना दिसल्या, पण त्या कधीच बाहेर आल्या नाहीत.
३. पुरावा नष्ट करण्याचा बनाव: संशयित चांगदेवने स्वतःच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचा डेटा 'क्रेडिट कार्ड हरवल्याचे' निमित्त करून डिलीट केला होता. मात्र, बाजूच्या मेडिकलमधील कॅमेऱ्याने त्याचे पितळ उघडे पाडले.
पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली
सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चांगदेव पाटीलला २ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कर्जापायी दागिने मिळवण्यासाठी हा खून केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, कोणाला संशय येऊ नये म्हणून तो नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात 'मिसिंग'ची तक्रार देण्यासाठीही हजर झाला होता.
> पोलिस कारवाई:
> बार्शी शहर पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेह नेमका कुठे टाकला, याचा शोध घेतला जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या