**पती-पत्नीच्या वादात पतीने तीन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही विष प्राशन करून घेतला जीव**

**पती-पत्नीच्या वादात पतीने तीन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही विष प्राशन करून घेतला जीव** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर ** : सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नी घर सोडून माहेरी गेल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या भीमा अण्णा वाघमारे (३४) या तरुणाने आपल्या तीन लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेऊन विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. भीमा यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिन्ही मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

भीमा अण्णा वाघमारे हे एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात व पत्नीमध्ये घरगुती आणि कौटुंबिक कारणांवरून सतत वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी पत्नीने तीन मुलांसह घर सोडले आणि माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी दोघांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सासरी परत येण्यास स्पष्ट नकार दिला होता. या घटनेमुळे भीमा यांच्यावर मोठा मानसिक ताण आला होता.

रात्रीच्या वेळी भीमा वाघमारे यांनी आपल्या तीन मुलांना – जानवी, प्रगती आणि बाबू घरून वळसंगजवळील शेतात नेले. तेथे त्यांनी तिन्ही चिमुकल्यांना विष पाजले आणि नंतर स्वतःही विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

वेळीच मदत मिळाल्याने तिन्ही मुलांचे प्राण वाचले आहेत. सध्या त्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल