**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले**
**ACB चा मोठा सापळा! चर्नी रोड शिक्षण कार्यालयातील लिपिकाला १.५ लाखांसह रंगेहात पकडले**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० मे २०२६ :** चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राहुल विठ्ठल शिंदे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात पकडले. इयत्ता ११वी व १२वी वर्गांसाठी प्रथम मान्यता देण्याची फाईल क्लिअर करण्यासाठी त्याने १.५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदार एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संस्थेची ११वी-१२वी मान्यतेची फाईल गेल्या काही महिन्यांपासून चर्नी रोड कार्यालयात प्रलंबित होती. शिंदे याने फाईल पुढे सरकवण्यासाठी १.५ लाख रुपयांची मागणी केली. नियमाप्रमाणे काम व्हायला हवे असतानाही लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी वरळी येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.
ACB पथकाने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्यावर सापळा रचण्यात आला. आज तक्रारदार १.५ लाख रुपये घेऊन कार्यालयात गेला. शिंदे याने रक्कम स्वीकारताच ACB अधिकाऱ्यांनी त्याला घटनास्थळावरच अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिंदे याची ACB कस्टडीत चौकशी सुरू आहे. शिक्षण विभागात अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई असल्याने कार्यालयात खळबळ उडाली आहे.
ACB अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासकीय कामकाजात लाचखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पुढील तपासात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या