**बार्शीमध्ये पाणी संकट गंभीर; ७-८ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक संतापले**
**बार्शीमध्ये पाणी संकट गंभीर; ७-८ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक संतापले**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, उन्हाळ्यात अनेक भागांत सात ते आठ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विरोधी पक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांनी या प्रकरणी बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना तातडीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, उजनी आणि चांदणी या दोन्ही प्रमुख पाणीपुरवठा योजना सुरू असतानाही आणि शहरात पुरेशी साठवण क्षमता उपलब्ध असतानाही नियोजनाचा पूर्ण अभाव, गळती, अपुरी मनुष्यबळ आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवेदनात अॅड. अक्कलकोटे यांनी सांगितले की, अनेक भागांत पाण्याचा दाब इतका कमी आहे की शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नव्या नळजोडण्यांनुसार वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक नागरिकांना टँकर, खाजगी विहिरी किंवा महागड्या दरात विकत घेतलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
**मुख्य मुद्दे अधोरेखित**
- ब्रिटिशकालीन पाथरी पाणीपुरवठा योजना (वीज खर्चाविना चालणारी) रेल्वे ब्रॉडगेजच्या कामादरम्यान बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्याची मागणी.
- पाणीपुरवठा व्यत्यय, गळती किंवा वेळापत्रक बदलाबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही.
- पाणीपुरवठा विभागातील अनेक अभियंते आणि कर्मचारी पदे रिक्त.
- पाणीगळतीची दुरुस्ती वेळेत होत नाही.
- उजनी-चांदणी योजनांच्या देखभाल दुरुस्तीची प्रलंबित बिले अदा न झाल्याने ठेकेदार कामात दिरंगाई करत आहेत.
**तातडीच्या मागण्या**
अॅड. नागेश अक्कलकोटे यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
1. किमान दोन दिवसाआड नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करणे.
2. सर्व पाणी टाक्या पूर्ण क्षमतेने भरणे.
3. वाढलेल्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठ्याची वेळ वाढवणे.
4. संपूर्ण शहरासाठी नवीन पाइपलाइन वितरण व्यवस्थेचा डीपीआर तातडीने तयार करणे.
5. पाथरी योजना पुन्हा कार्यान्वित करणे.
6. उन्हाळ्यात टँकरची संख्या वाढवणे.
7. पाणीगळती तातडीने दुरुस्त करणे.
8. प्रलंबित बिले तातडीने अदा करणे.
9. सोशल मीडियावर नियमित पाणीपुरवठा माहिती देणे.
10. रिक्त पदे तातडीने भरणे.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि प्रादेशिक संचालक यांना पाठविण्यात आली आहे. बार्शीकरांच्या या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अॅड. अक्कलकोटे यांनी केली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या