**सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली; २०२६-२७ साठी ८४२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी**

**सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली; २०२६-२७ साठी ८४२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ११ जुलै : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली. एकूण ८४२ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र राखीव निधीचीही व्यवस्था करण्यात आली.

बैठकीत प्रथम ११ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मागील बैठकीच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०२५-२६ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यात सर्वसाधारण योजनेत ७८३ कोटी (१०० टक्के), अनुसूचित जाती उपयोजनेचा १४७ कोटी (१०० टक्के) आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेचा ५.४३ कोटी (९९.८३ टक्के) खर्च झाल्याची नोंद घेण्यात आली. एकूण ९३५.४४ कोटींपैकी जवळपास पूर्ण खर्च सुनिश्चित झाला.

**२०२६-२७ चा आराखडा**  
शासनाने प्रारंभी ६९३.९० कोटींची मर्यादा निश्चित केली होती. यात राज्यस्तरावरून नागरी भागासाठी ८०.२६ कोटी आणि अक्कलकोट व सांगोला आकांक्षित तालुक्यांसाठी १० कोटी अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने अंतिम नियतव्यय ८४२ कोटी रुपये निश्चित करण्यात आला.

**राखीव योजनांसाठी १८२.६० कोटींची तरतूद**  
- नविन्यपूर्ण योजना : २९.४७ कोटी  
- मूल्यमापन व संनियंत्रण : ४.२१ कोटी  
- शाश्वत विकास ध्येय (SDG) सूक्ष्म प्रकल्प : ८.४२ कोटी  
- महिला व बालविकास : २५ कोटी  
- शालेय शिक्षण व क्रीडा : ४५ कोटी  
- दिव्यांग कल्याण व सक्षमीकरण : ८ कोटी  
- गृह विभाग : २४ कोटी  
- गड-किल्ले संवर्धन : २४ कोटी  
- महसूल विभाग (गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन) : १४.५० कोटी  

बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी शिक्षण, क्रीडा, महिला-बालविकास, दिव्यांग कल्याण, गड-किल्ले संवर्धन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार असल्याचे सूचित होते.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या