पोलीसांनीच टाकला दरोडा; पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात दरोडा टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रताप असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी विकल्या.
याप्रकरणी दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काल या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली या आरोपीने दिली.
तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने या आरोपीला बाजारात विकण्यास सांगितले. स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही, परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.