**राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीला सर्जनशील व स्पर्धात्मक बनवणार – चंद्रकांत पाटील**
**राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीला सर्जनशील व स्पर्धात्मक बनवणार – चंद्रकांत पाटील**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, १५ नोव्हेंबर ;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) हे युवा पिढीचे भवितव्य घडवणारे, अत्यंत व्यावहारिक, साहित्य-कला-डिझाईनसह सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे आणि जागतिक स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांना आघाडीवर नेणारे धोरण असल्याचे प्रतिपादन केले.
विले पार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील करिअर संधी आणि नवउदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित ‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ या तीन दिवसीय युएएफ एक्स्पो २०२५ चे उद्घाटन आज श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. उर्मीज आर्ट फोरमने हे एक्स्पो आयोजित केले असून देशभरातील डिझाईन, आर्किटेक्चर, फॅशन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि यूजर एक्स्पिरियन्स (यूएक्स) या क्षेत्रांतील नामवंत संस्था, तज्ज्ञ आणि उद्योगप्रमुख सहभागी झाले आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री म्हणाले, “नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, स्टार्टअप संस्कृती आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला प्राधान्य देण्यात आले आहे. डिझाईन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे नवे इंजिन ठरणार आहे. या एक्स्पोमुळे हजारो विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी एकाच छताखाली मिळणार आहेत.”
यावेळी आंदेरीचे आमदार पराग अळवणी, उर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिका तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डिझाईन मेंटर कोमल उल्लाल, प्रसिद्ध आर्किटेक्ट गुरुचरण सिंग संधू, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मोहन वेदपाठक, निफ्ट, एसआरआयएस, मिट इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एक्स्पोमध्ये ५० हून अधिक नामांकित डिझाईन कॉलेजेसचे स्टॉल्स, थेट पोर्टफोलिओ रिव्ह्यू सेशन्स, आंतरराष्ट्रीय मेंटर्ससोबत वन-टू-वन मार्गदर्शन, वर्कशॉप्स आणि स्कॉलरशिप्सची घोषणा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा यूएई, इटली आणि कॅनडातील डिझाईन स्कूल्सही सहभागी झाल्या आहेत.
एक्स्पो १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनाशुल्क खुला राहणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या