**सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज शिबिरे; २४-२५ डिसेंबरला तालुका स्तरावर आयोजन**
**सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज शिबिरे; २४-२५ डिसेंबरला तालुका स्तरावर आयोजन**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. २३ डिसेंबर : राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि पब्लिक सेक्टर बँक अलायन्ससोबत त्रिपक्षीय करार केला आहे. याअंतर्गत जनसमर्थ पोर्टल आणि अॅग्रीस्टॅक डेटा प्रणालीचे एकीकरण झाले असून, पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ आणि कागदरहित पद्धतीने कर्ज मंजुरी मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार असून, २४ आणि २५ डिसेंबर २०२५ रोजी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, लीड बँकेने जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) आणि पीक कर्ज मंजुरीसाठी जनसमर्थ पोर्टलचा वापर करण्याचे ठरवले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका या पोर्टलवर यशस्वीपणे समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शिबिरे गट विकास अधिकारी (बीडीओ) कार्यालयात होणार असून, तेथे आवेदन भरण्यासाठी कॅम्प आयोजित केले जातील. बीडीओंनी सेतू केंद्रे, ग्रामपंचायत, महा-ई-सेवा केंद्रे, आधार सेवा केंद्रे आणि सीएससी ऑपरेटरांना सुविधा पुरवाव्यात, जसे की वीज कनेक्शन, मोठे हॉल किंवा सभागृह आणि शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था. यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येक गावातून किमान १० शेतकऱ्यांची आवेदने भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी तलाठी आणि कृषी सहायकांना जबाबदार धरण्यात आले असून, तालुक्यात सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्याचे सांगितले आहे. महा-ई-सेवा केंद्रांना जास्तीत जास्त आवेदने भरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सेतू कार्यालयातील कर्मचारी शिबिरात उपस्थित राहतील. तहसीलदार आणि कृषी अधिकारी शिबिरांना भेटी देऊन देखरेख करतील, तर मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी सर्व आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करतील.
लीड बँक तालुका प्रतिनिधींनी शिबिरात उपस्थित राहून पर्यवेक्षण करावे, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधावा, असे पत्रात नमूद आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण करण्याचे असून, कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांना जलद कर्ज मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या