**तुळजापूरमध्ये राजकीय वादातून रक्तपात: गोळीबार, कोयत्याने हल्ला; एक गंभीर जखमी**
**तुळजापूरमध्ये राजकीय वादातून रक्तपात: गोळीबार, कोयत्याने हल्ला; एक गंभीर जखमी**
**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव :** तुळजाभवानी देवीच्या पवित्र तीर्थक्षेत्रात भरदिवसा राजकीय वाद चिघळून हिंसाचार उसळला. मंगळवारी (१६ डिसेंबर २०२५) सायंकाळी रस्त्याच्या कामावरून सुरू झालेल्या भांडणातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात कोयता, लोखंडी रॉड आणि बंदुकीचा वापर करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
घटना तुळजापूर शहरातील मुख्य भागात घडली. महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकांवर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी कुलदीप मगर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. हल्लेखोर टोळक्याने हवेत गोळीबार करून दहशत माजवली. यात गंगणे कुटुंबीयांचा समावेश असल्याचा आरोप होत आहे.
या हिंसाचारामुळे तुळजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वी (२१ डिसेंबरला मतदान) घडलेल्या या घटनेने परिसर हादरला. दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहराची शांतता आणि प्रतिष्ठा धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.
माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाल्याचा थेट आरोप केला. त्यांनी म्हटले की, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना राजकीय संरक्षण मिळत असल्याने असे प्रकार घडत आहेत. आरोपींमध्ये अवैध धंदे आणि दादागिरीत सक्रिय असलेले समावेश असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिवचे पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करून घटनेचा तीव्र निषेध केला. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
ही घटना तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला काळिमा फासणारी ठरली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना अपेक्षित आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या