**बार्शी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: चार वर्ष जुन्या क्रेडिट कार्ड फसवणुकीतील आरोपी दिल्लीतून जेरबंद**
**बार्शी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: चार वर्ष जुन्या क्रेडिट कार्ड फसवणुकीतील आरोपी दिल्लीतून जेरबंद**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. २६ : क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या चार वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक करून बार्शी शहर पोलिसांनी यशस्वी कारवाई केली. या प्रकरणातील पीडिताची संपूर्ण रक्कम १ लाख ९८ हजार २०८ रुपये परत मिळवून देण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडित महादेव विठ्ठल मिरगणे (५३, शिक्षक, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) यांना क्रेडिट कार्ड विभागाकडून बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागवून त्यांच्या खात्यातून १ लाख ९८ हजार २०८ रुपये काढले. यानंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सायबर पोलिस आणि बार्शी शहर पोलिसांनी संयुक्त तपास केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि बार्शी शहर पोलिसांना पुढील तपास सोपवला. तपासात आरोपी दिल्लीचा असल्याचे समोर आले. कुलकर्णींच्या परवानगीने पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात पथक दिल्लीला रवाना झाले.
गोपनीय माहितीच्या आधारावर उत्तर दिल्लीतील बाजार पोलिसांच्या मदतीने आरोपी नरेश महेशचंद शर्मा (४५, मजूर, रा. बगीची रघुनाथ, उत्तर दिल्ली) याला अटक करण्यात आली. बार्शीला आणल्यानंतर आरोपीकडून पीडिताची रक्कम तात्काळ परत दिली गेली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक निरीक्षक महेश गळगटे, अभय माकणे, कॉन्स्टेबल दिगंबर बरबडे, सचिन नितनात, अवी पवार आणि सायबर पोलिसांचे रतन जाधव यांनी पार पाडली.
निरीक्षक कुकडे यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला: क्रेडिट कार्ड, एटीएम, आधार किंवा बँकेच्या नावाने येणाऱ्या अनोळखी कॉलवर ओटीपी देऊ नका. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या