**जेजुरी भंडारा आग प्रकरण : १६ जखमी, भेसळीच्या संशयाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; टेम्पो जप्त, नमुने तपासणीस**
**जेजुरी भंडारा आग प्रकरण : १६ जखमी, भेसळीच्या संशयाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; टेम्पो जप्त, नमुने तपासणीस**
**KDM NEWS प्रतिनिधी पुणे, २४ डिसेंबर :** जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दणदणीत विजयानंतर खंडोबा मंदिराजवळील गडाच्या पहिल्या पायरीवर विजयोत्सवी मिरवणुकीदरम्यान भंडारा उधळताना अचानक भीषण आग भडकली. या दुर्घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेविकांसह एकूण १६ जण गंभीर भाजले. जखमींमध्ये महिलांचा मोठा समावेश असून, चेंगराचेंगरीत एका १० वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला. सर्व जखमींना जेजुरीतील खासगी व सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, काहींना पुण्यात हलवण्यात आले.
दुर्घटना रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबाच्या चरणी भंडारा अर्पण करत होते. यावेळी जळते दिवे, कापूर आणि फटाक्यांच्या संपर्कात भंडारा येताच जोरदार भडका उडाला. गर्दीत धुराचे लोट व स्फोटासारखा आवाज झाल्याने गोंधळ उडाला होता.
प्राथमिक तपासात भंडाऱ्यात रसायनांची भेसळ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, तपासात आग भंडाऱ्याशी थेट संबंधित नसल्याचे दिसते आहे. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून घटनास्थळाहून सुमारे २,२०० किलो भंडारा जप्त करून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे.
या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी जेजुरीत धडक मोहीम राबवली. बेळगावहून भेसळयुक्त भंडारा घेऊन येणाऱ्या एका टेम्पोला जप्त करण्यात आले. शहरातील मुख्य बाजारपेठ व गड परिसरातील विक्रेत्यांची झडती घेऊन अनेक नमुने ताब्यात घेण्यात आले. जेजुरी पोलिसांनीही या मोहिमेत सहकार्य केले.
नवनिर्वाचित महापौर जयदीप बारभाई यांनी भेसळयुक्त भंडारा विक्रीवर कठोर कारवाईची घोषणा केली. "नगरपरिषद विशेष पथक तयार करून शहरात अशा विक्रीला आळा घालू," असे ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटना दुर्दैवी असल्याचे सांगत भेसळीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
स्थानिक नागरिक व माजी विश्वस्तांनी यापूर्वीच भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. आठ महिन्यांपूर्वी माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी मंत्री झिरवाळ यांची भेट घेऊन गोदामांवर छापे घालण्याची विनंती केली होती, मात्र त्यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप होत आहे.
पोलिस तपास सुरू असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जेजुरीत भंडारा विक्रीवर कायमस्वरूपी निर्बंध व सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली आहे. भेसळ रोखण्यासाठी उत्पादक कारखान्यांपर्यंत कारवाई पोहोचवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या