**वैराग ग्रामीण रुग्णालयासाठी शासकीय जमिनीला मंजुरी; ३० खाटांच्या बांधकामाला मार्ग मोकळा**
**वैराग ग्रामीण रुग्णालयासाठी शासकीय जमिनीला मंजुरी; ३० खाटांच्या बांधकामाला मार्ग मोकळा**
**KDM NEWS प्रतिनिधी**दि. १६ : बार्शी तालुक्यातील वैराग येथे प्रस्तावित ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांच्या विनंतीनुसार गट क्रमांक ४२२ मधील एकूण ४ हेक्टर ४५ आर क्षेत्रापैकी २ हेक्टर ४५ आर जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी मिळेल, अशी माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ८ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४० आणि महाराष्ट्र जमीन महसूल (शासकीय जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ च्या नियम ५-६ नुसार ही प्रक्रिया पार पडली. सदर जागेवरील बागेचे आरक्षण बदलून ग्रामीण रुग्णालयासाठी नगर विकास विभागाची मंजुरी घेण्याच्या अटीवर ही जमीन महसूल मुक्त आणि मूल्यरहित कब्जा हक्काने जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आली आहे. यापूर्वी या जागेचा आगाऊ ताबा देण्यात आला होता, ज्याला आता कार्योत्तर मंजुरी मिळाली.
आमदार सोपल म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून वैराग परिसरातील आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांच्या सहकार्याने मी शासन स्तरावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओम प्रकाश शेटे यांच्या सहकार्याने हा निर्णय शक्य झाला." ते पुढे म्हणाले की, लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन बांधकाम प्रक्रिया गतिमान करण्यात येईल. शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून रुग्णालय लवकर सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
या रुग्णालयामुळे वैराग आणि बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना जवळपास वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून, आपत्कालीन उपचार आणि प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र जागेच्या उपलब्धतेमुळे काम रखडले होते. आता मंजुरीमुळे बांधकामाला वेग येईल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या