*बार्शी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू; १७ जानेवारीपर्यंत ११४ अर्ज विक्री*
*बार्शी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू; १७ जानेवारीपर्यंत ११४ अर्ज विक्री*
*KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली आहे. २१ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. मात्र, १८ जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीदिवशी ही प्रक्रिया बंद राहील. आतापर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नसून, १७ जानेवारी अखेरपर्यंत विविध गट-गणांसाठी एकूण ११४ अर्ज विक्री झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडून नामनिर्देशन पत्र घेऊन स्वाक्षरी करून दाखल करणे बंधनकारक आहे. उमेदवार किंवा सूचकाची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असून, एका गट किंवा गणासाठी जास्तीत जास्त चार पत्र दाखल करता येतील. उमेदवाराला जिल्हा परिषदसाठी जिल्ह्यातील कोणत्याही गटाच्या मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, तर पंचायत समितीसाठी तालुक्यातील मतदार यादीत नाव हवे. सूचक मात्र त्या गट किंवा गणातील मतदार असावा आणि एक सूचक एकाच पत्रावर स्वाक्षरी करू शकतो. अशिक्षित सूचकाने अंगठा प्रमाणित करणे आवश्यक आहे.
शपथपत्राबाबत कडक नियम लागू आहेत. ते न्यायदंडाधिकारी, नोटरी किंवा शपथ आयुक्तासमोर साद्या कागदावर करून दाखल करावे. प्रत्येक पानावर उमेदवाराची सही व नोटरीचा शिक्का हवा. शपथपत्रातील सर्व रकाने भरलेले असावेत; 'NIL' किंवा 'Not Applicable' स्पष्ट नमूद करणे बंधनकारक. तसेच, ग्रामपंचायतीकडील ना-देय प्रमाणपत्र (मालमत्ता कर, पाणीपट्टी इ.), शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा, ठेकेदार नसल्याचा दाखला आणि मतदार यादीची प्रमाणित प्रत जोडणे गरजेचे आहे.
राखीव जागांसाठी अनुसूचित जाती, जमाती किंवा मागासवर्ग उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी. वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी अर्जाचा पुरावा व हमीपत्र आवश्यक. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना २-अ सादर करून पोहोच घ्यावी आणि उमेदवारांनी नमुना २-ब व पोहोचची प्रत २१ जानेवारी दुपारी ३ पर्यंत दाखल करावी.
अनामत रक्कम रोख स्वरूपातच स्वीकारली जाईल: जिल्हा परिषदसाठी सर्वसाधारण प्रवर्गात १००० रुपये, तर राखीव प्रवर्गात ५०० रुपये; पंचायत समितीसाठी अनुक्रमे ७०० व ३५० रुपये. ही रक्कम दाखल करण्यापूर्वी जमा करून पावती जोडावी.
उमेदवारांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक असून, ते नामनिर्देशन दाखल करण्याच्या एक दिवस आधी उघडलेले हवे. पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी. कार्यालयात उमेदवारासह सूचक व दोन व्यक्तींनाच प्रवेश; दोनपेक्षा जास्त वाहने किंवा मिरवणूक १०० मीटर अंतरावर थांबवावी. या खर्चाचा निवडणूक खर्चात समावेश होईल.
१७ जानेवारी अखेर गट-गणनिहाय अर्ज विक्री: उपळाई ठोंगे (८+१४=२२), पांगरी (७+१३=२०), पानगाव (१०+९=१९), उपळे दुमाला (५+१७=२२), मालवंडी (८+४=१२), शेळगाव आर (८+११=१९). एकूण ४६ जिल्हा परिषद + ६८ पंचायत समिती = ११४ अर्ज.
निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या