*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची*

*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची* 

*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, ३० जानेवारी २०२६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयानंतर त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही उद्याच होऊ शकतो, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्त आहे. सुनेत्रावहिनींद्वारे ती भरता येईल याकडे आमचं जास्त लक्ष आहे. कदाचित एकमत झालं तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो."

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असून, त्यांना याबाबत विरोध नसल्याचे समजते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांसह नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला. पक्षातील बहुतांश आमदार सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार असून, यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाईल. एकमत झाल्यास संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी या पदासाठी होकार दिल्याची माहिती आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी ही घाईची हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या एकजुटीसाठी आणि महायुती सरकारातील भूमिका मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**