*बार्शी तालुक्यातील रुई येथे १७ वर्षीय मुलीचा खून; प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनी ओढणीने गळा आवळला, कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव*
*बार्शी तालुक्यातील रुई येथे १७ वर्षीय मुलीचा खून; प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनी ओढणीने गळा आवळला, कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव*
*KDM NEWS वैराग (प्रतिनिधी):* सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रुई गावात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजदरम्यान १७ वर्षे तीन महिने वयाच्या श्रावणी राजेंद्र नरसुडे हिचा तिच्याच वडिलांनी ओढणीने गळा आवळून जाणीवपूर्वक खून केल्याची धक्कादायक घटना तीन महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून करण्यात आला असून, नंतर घरातील कीटकनाशक औषध पाजून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. वैराग पोलिसांनी तपासानंतर आरोपी वडिल राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय ३४, रा. रुई) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, बार्शी सत्र न्यायालयाने त्यांना २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रावणी बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिच्या एका मुलासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय वडिलांना आल्याने त्यांनी घरीच मुलीचा गळा ओढणीने आवळला. खूनानंतर आत्महत्येचा आभास निर्माण करण्यासाठी तिला कीटकनाशक पाजले. मुलीला उपचारासाठी धाराशिव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली होती.
पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिस ठाण्याच्या पोलिस हेडकॉन्स्टेबल संदेश कृष्णदेव पवार यांनी तपास हाती घेतला. मोबाईलमधील माहिती डिलीट केल्याचे, तांत्रिक बाबी संशयास्पद असल्याचे आढळले. पंचनामा, वैद्यकीय अहवाल व शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट नमूद होते. यामुळे प्रकरण हत्या असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) व कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू असून, परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या