*बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मंजूर; करवाढ नाही, तरीही सभेत जोरदार आरोप-प्रत्यारोप*

*बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मंजूर; करवाढ नाही, तरीही सभेत जोरदार आरोप-प्रत्यारोप* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. दुपारी १ वाजता सुरू झालेली ही सभा दुपारी ४.१५ वाजता संपली. सभेत नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात महसुली व भांडवली जमेसह शासन अनुदान, कर्ज स्वरूपातील मदत धरून एकूण ५१२ कोटी ८६ लाख ४२ हजार ४०४ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रारंभिक शिल्लक मिळून ही तरतूद करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी पिठासन अधिकारी म्हणून अभिभाषणात सांगितले की, महिलांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोणतीही करवाढ किंवा दरवाढ न करता हा अर्थसंकल्प सादर केला आहे. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे.

विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी ४३ मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण करत महसुली व भांडवली आकड्यांमध्ये फुगवाफुगवी केल्याचा आरोप केला. मागील वर्षीची भांडवली जमा १४१ कोटी ८३ लाख २२ हजार १४९ रुपये असताना यंदाची प्रारंभिक शिल्लक १३३ कोटी ७३ लाख २५ हजार ९९३ रुपये एवढी कशी राहिली, असा सवाल करत त्यांनी आकडेवारीत दुरुस्ती करण्याची मागणी केली. अधिकारी वर्ग सत्ताधारी व विरोधकांची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याची टीका केली. जिल्हा नियोजन समितीचे बजेट सुमारे ७०० कोटी असताना बार्शीचा ६९८ कोटींचा आकडा अवास्तव आहे. अनेक योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसताना तरतूद दाखवली आहे. उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाईनसाठी ८० टक्के अनुदान अपेक्षित असताना ठेकेदाराला ८० टक्क्यांपेक्षा जास्त बिले दिल्याचा आरोपही त्यांनी केला. ठेकेदारांच्या देयकांचा उल्लेखच का नाही, असा मुद्दाही उपस्थित केला.

अक्कलकोटे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक सिग्नल व्यवस्था, धूळ प्रदूषण नियंत्रण, सामाजिक संस्थांना स्मशानभूमी-शाळा-बगीचा दत्तक योजना, बार्शीतील बारा ज्योतिर्लिंग परिसरातील रस्त्यांवर कमानी उभारणे आणि दस्तगीर दर्गा दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची मागणी केली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात २५ टक्के देवस्थान, २५ टक्के नगरपरिषद व ५० टक्के राज्य शासन निधीची तरतूद असल्याचे सांगत आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी अर्थसंकल्प नियोजनशून्य व भ्रष्टाचाराने भरलेला असल्याचा आरोप केला. गटार दुरुस्ती, भुयारी गटार योजना (७० टक्के पूर्ण असताना पुन्हा गाळ काढण्याची तरतूद), घरपट्टी-नळपट्टी वसुलीतील तफावत व अपूर्ण कामांवर प्रश्न उपस्थित केले. यावर सत्ताधारी नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे, दीपक राऊत, अमोल चव्हाण, भैय्या (संतोष) बारंगुळे व उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात काही काळ गोंधळ झाला.

नगरसेवक विजय (नाना) राऊत यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत शहराचा सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार झाल्याचे सांगितले. प्रत्येक भागात निधी कमी पडणार नाही, भेदभाव होणार नाही व शासन योजना १०० टक्के राबवल्या जातील, अशी ग्वाही दिली. महिलांसाठी अलीपुर रोड व उपळाई रोडवर नवीन स्वच्छतागृहे बांधण्याची घोषणा केली.

नगरसेविका विद्या बंगाळे यांनी सभागृहाचे गांभीर्य राखण्याचे आवाहन करत ५० टक्के महिला सदस्य उपस्थित असताना गोंधळ योग्य नसल्याचे सांगितले. विरोधी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे व विद्या बंगाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून ११ कोटींची तरतूद असताना तो खर्च त्याच भागात व्हावा, अशी मागणी केली. भीम नगर, सिद्धार्थ नगर व अण्णाभाऊ साठे नगरमध्ये नव्या गटारी, सिमेंट रस्ते व मूलभूत सुविधा देण्याची जोरदार मागणी केली. दलित वस्त्या, महिला व सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला.

सत्ताधारी नगरसेविका कांचन मोहिते यांनी महिला व बालकल्याणावर अधिक तरतूद करण्याची मागणी केली. विरोधी नगरसेवक अनिकेत कारंडे यांनी पाणीपुरवठा विभागातील वॉल्व ओपनरवर मागील ८-९ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना शहराला ८-१० दिवस अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे गौडबंगाल असल्याचा प्रश्न उपस्थित केला. संदेश काकडे यांनी अर्थसंकल्पाची पाठराखण करत विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

महसुली खर्चात कर्मचारी वेतन, सेवानिवृत्ती देयके, बालवाडी, ताई-दायी अंशदान व शिक्षण मंडळासाठी ३८ कोटी २० लाख ५२ हजार २९७ रुपये, प्रशासकीय खर्च ३ कोटी ५ लाख व इमारती दुरुस्तीसाठी १७ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद आहे.

सभेच्या शेवटी मराठी भाषा गौरव दिन असताना महाराष्ट्र गीत न लावल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शंकेश्वर बागेतील चबुतऱ्यांवर स्व. अजित पवार यांचाही पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली.

या चर्चेत नगरसेवक भारत पवार, महेदिमियां लांडगे, सायरा मुल्ला, रागिनी पाचपुते, आकाश राऊत, मुज्जमिल पठाण आदींनी सहभाग घेतला. करअधिकारी विठ्ठल पाटोळे व जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**