**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू**

**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** बार्शी तालुक्यात वर्षानुवर्षे चालणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रॅक्टिसला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय पदवी नसताना ‘प्रिन्स क्लिनिक’ चालवणाऱ्या शंकर मनोहर पाठक (उर्फ डॉ. एस. एम. पाठक) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात उपचारादरम्यान तानाजी नरहरी सुतार (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

५ मे २०२६ रोजी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार ‘प्रिन्स क्लिनिक’ची तपासणी केली. तपासणीत शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांनी ‘B.A.M.S.’ पदवी दर्शवून रुग्णांची दिशाभूल केल्याचा संशय आहे. क्लिनिकमधील औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, जप्त केलेल्या औषधांचा आणि साहित्याचा फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित आहे.

**रुग्णमृत्यूमुळे खळबळ**  
उपळाई ठोंगे येथील तानाजी सुतार यांना कथित बोगस डॉक्टरकडून उपचार घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली. ग्रामीण भागात अशा बिनपात्र व्यक्तींकडून उपचार घेण्याची सक्ती होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात बंगाली डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही व्यक्तींकडूनही उपचार चालू असल्याची तक्रार नागरिक करतात.

**जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य ॲक्शन मोडवर**  
घटनेची गांभीर्याने दखल घेत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड व संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात बिनपरवाना व बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. शून्य सहनशीलता ही आमची भूमिका राहील,” असा स्पष्ट इशारा अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिला.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल