**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी**

**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** ६ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता बार्शी-धाराशिव रोडवरील कदम वस्ती (डाळ मिल जवळ) येथे भीषण रस्ता अपघात झाला. पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक **MH-12-RN-6846** ने भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने (राँग साईड) येऊन दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

अपघातग्रस्त दुचाकी क्रमांक **MH-25-AA-0516** वर गोसेवाडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील धनाजी दादाराव मस्के (सासरे) आणि त्यांच्या पत्नी रोहीणी धनाजी मस्के (सासू) होते. ते चिखर्डे (ता. बार्शी) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभातून परतत होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा जावई कुमार सुभाष अंधारे (वय ३२, रा. मानकेश्वर, ता. भुम, जि. धाराशिव) आपल्या दुचाकीवर पत्नीसह येत होता.

**प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार,** कारने अत्यंत वेगात राँग साईडने येऊन धडक दिल्याने धनाजी मस्के व रोहीणी मस्के रस्त्यावर पडले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. धनाजी मस्के यांचा उजवा पाय मोडला असून डोकीसह इतर ठिकाणी मार लागला. रोहीणी मस्के यांनाही डोकीस आणि शरीराच्या विविध ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. दोघांनाही लगेच बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत दोघांची प्रकृती गंभीर असून ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते.

अपघातानंतर कार चालकाने जखमींना मदत न करता वाहन सोडून पळ काढला. कार समोरील बोनेट व काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीची समोरील रिम, बंपर, हँडल, टँकी इ. चे सुमारे ४०,००० रुपयांचे नुकसान झाले. कारचे नुकसान सुमारे ८०,००० रुपये असे एकूण १,२०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कुमार सुभाष अंधारे यांनी बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कार क्रमांकावरून चालकाचा शोध सुरू केला आहे. अपघातस्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिकांनी तातडीने मदत केली.

या अपघाताने परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरील वाहतुकीच्या अनुशासनाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल