**बार्शीचा कृषी सुपरहिट : पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा सन्मान!**

**बार्शीचा कृषी सुपरहिट : पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा सन्मान!** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** खरीप हंगामात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बार्शी तालुक्यातील कृषी विभागाच्या यशस्वी प्रयोगांमुळे जिल्हा व राज्यस्तरावर चर्चा होत असून, हा सन्मान संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

तालुक्यात खरीप हंगामात एकूण १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. यातील तब्बल ९० टक्के म्हणजे सुमारे ९१ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले जाते. तूर, उडीद आणि मूग या पिकांनाही महत्त्वाचे स्थान आहे. सध्या सरासरी ७ ते ८ क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे उत्पादन वाढविण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

**बीबीएफ आणि टोकन पद्धतीचा यशस्वी प्रयोग**  
कृषी विभागाने रुंद सरी-वरंबा पद्धत (Broad Bed Furrow - बीबीएफ) आणि टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रभावी प्रचार व प्रसार केला. या पद्धती पारंपरिक पेरणीच्या तुलनेत प्रति एकर ३ ते ४ क्विंटल अतिरिक्त उत्पादन देतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे.

टोकन पद्धतीत मजुरांची कमतरता जाणवत असल्याने कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर टोकन यंत्र उपलब्ध करून दिले. या यंत्राच्या साहाय्याने एका मजुराला एका दिवसात किमान दोन एकर क्षेत्रावर लागवड करता येते. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यात मोठी बचत झाली आहे.

**१३ हजार हेक्टरवर यशस्वी लागवड**  
तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रेरित करत कृषी विभागाने जवळपास १३ हजार हेक्टर क्षेत्रावर बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केली. या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली असून, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्या नियोजनबद्ध आणि शेतकरीहिताच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सन्मानप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “बार्शी तालुक्यात कृषी विभागाने राबवलेले उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञान गावागावात पोहोचवून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संतोष कोयले यांचे कार्य इतर तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल