**गडकरींचा सोलापूरला सुखद धक्का : १४५५ कोटींचा रिंगरोड आणि उड्डाणपूल मंजूर**

**गडकरींचा सोलापूरला सुखद धक्का : १४५५ कोटींचा रिंगरोड आणि उड्डाणपूल मंजूर** 
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी १४५५ कोटी रुपयांच्या ३३ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडसह अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग आणि चार पदरी बाह्यवळण रस्त्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

गुरुवारी अक्कलकोटमध्ये झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्कलकोट येथे गडकरी यांना भेटून सोलापूर शहर व परिसरातील विकासकामांसाठी निवेदन दिले होते. त्यास तत्काळ प्रतिसाद देत गडकरी यांनी मागण्या पूर्ण केल्या.

           प्रमुख मंजूर प्रकल्प
- **३३ किमी रिंगरोड :** ६० मीटर रुंदीचा हा रिंगरोड सोलापूरला लागून असलेल्या अक्कलकोट, हैदराबाद, तुळजापूर, पुणे आणि विजयपूर या पाच महामार्गांना जोडणारा असेल. बस व रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना महामार्ग गाठणे सोयीचे होईल.
- **भुयारी मार्ग :** अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक ते महालक्ष्मी मंदिर व मल्लिकार्जुन नगर परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड.
- **चार पदरी बाह्यवळण रस्ते :** 
  - हैद्राबाद रस्त्यावरील तांदूळवाडी ते विजयपूर रस्त्यावरील हत्तूरपर्यंत.
  - तुळजापूर रस्त्यावरील काटगाव ते पुणे महामार्गावरील बाळेपर्यंत.

या बाह्यवळण रस्त्यांमुळे शहरातून होणारी जड वाहतूक बाहेरून वळवली जाईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल.

         उड्डाणपुलासाठी १०२० कोटी
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १०२० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. गडकरी यांनी यापूर्वी दिलेला शब्द पूर्ण करत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बीएसएनएल आणि रेल्वे विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी असल्याने दिल्लीत संपर्क साधून काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुल टोल फ्री ठेवण्याची मागणीही मान्य केली जाणार असल्याचे सूचित केले.
          
 डीपी रोडसाठी तोडगा
शहरातील डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) रस्त्यांबाबत आमदार कोठे यांनी केलेल्या मागणीवर गडकरी यांनी लवकरच तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिले.

KDM NEWS प्रतिनिधी 
.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल