**बार्शी : शिवशक्ती मैदानावर क्रिकेट शिबिरात दगडी रोलरखाली १४ वर्षीय वीरेनचा मृत्यू; सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष?**
**बार्शी : शिवशक्ती मैदानावर क्रिकेट शिबिरात दगडी रोलरखाली १४ वर्षीय वीरेनचा मृत्यू; सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष?**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** शहरातील शिवशक्ती मैदानावर शनिवारी सकाळी समर क्रिकेट कॅम्पच्या समारोपाच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी अपघातात १४ वर्षीय वीरेन योगीराज चौधरी (रा. सुभाष नगर, बार्शी) याचा मृत्यू झाला. खेळपट्टी रोलिंग करताना दगडी रोलरने त्याला गंभीर जखमी केले. उपचारासाठी डॉ. जगदाळे मामा रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन (BTCA) अकॅडमीचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर मैदानावर सुरू होते. खेळपट्टीची देखभाल आणि रोलिंग सुरू असताना ही घटना घडली.
सुरक्षा नियमांची पडझड?
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन अकॅडमीच्या सामान्य सुरक्षा नियमांनुसार खालील गोष्टी स्पष्टपणे बंधनकारक आहेत:
- मैदानावर काम चालू असताना (रोलिंग, देखभाल, नेट प्रॅक्टिस) खेळाडूंना निर्देशित क्षेत्राबाहेर ठेवणे.
- दगडी रोलर, मशीनरी किंवा उपकरणे चालू असताना मुलांना सुरक्षित अंतरावर ठेवणे.
- कोच किंवा सुपरवायझरची देखरेख शिवाय मैदानावर फिरणे किंवा खेळणे पूर्णपणे बंद.
- कोणतीही जखम झाल्यास तातडीने कोचला कळवणे आणि प्राथमिक उपचार करणे.
या नियमांनुसार काम सुरू असताना मुलांना मैदानावरून दूर ठेवणे आवश्यक होते. मात्र, घटनेच्या वेळी मैदानावर विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे आणि पुरेशी देखरेख नसल्याचे पालक व नागरिक सांगत आहेत.
मैदानाची मालकी
शिवशक्ती मैदान हे **श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी** (कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेचे) च्या मालकीचे आहे. अकॅडमीला मैदान वापरण्यासाठी परवानगी कशी मिळाली आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन झाले का, याचीही चौकशी अपेक्षित आहे.
नागरिकांची मागणी
वीरेनच्या अकस्मात मृत्यूने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालक, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी घटनेची **निष्पक्ष व सखोल चौकशी** करण्याची मागणी केली आहे. निष्काळजीपणा आढळल्यास अकॅडमी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनने अद्याप याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, प्राथमिक तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या