**बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली; सुमारे २ कोटींची वसुली**

**बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली; सुमारे २ कोटींची वसुली** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय महा-लोकअदालतीत एकूण २४५७ प्रकरणे तडजोडीने सोडवण्यात आली. यात प्रलंबित प्रकरणांतून १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये आणि दाखलपूर्व प्रकरणांतून ७५ लाख ६६ हजार ७४ रुपये अशी एकूण जवळपास २ कोटी रुपयांची वसुली झाली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका विधी सेवा समिती व बार्शी वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत पार पडली.

या महालोकअदालतीत बार्शी न्यायालयातील ३७२१ प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे आणि ६५०४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण १०२२५ प्रकरणे तडजोडीसाठी समोर आणण्यात आली होती. यापैकी २४५७ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली.

**चार पॅनल्समध्ये कामकाज**

लोकअदालतीसाठी चार पॅनल्स तयार करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती एच. यू. यू. पाटील आणि चौथे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर. पी. बागडे यांच्या पॅनल्सने कामकाज पाहिले. तसेच सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती जी. एस. पाटील यांच्या न्यायालयात गुन्हा कबुलीचे विशेष कामकाज सुरू ठेवण्यात आले.

**विशेष बाब**

पॅनल क्रमांक ४ मधील न्यायाधीश श्रीमती आर. पी. बागडे यांनी वयोवृद्ध पक्षकार सखुबाई शंकर गवळी यांच्यासाठी स्वतः दालनाबाहेर जाऊन तडजोडीची पूर्तता केली. ही घटना उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

**महत्त्वाच्या प्रकरणांतील निकाल**

- मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरण: १ प्रकरण तडजोडीने निकाली, १२ लाख रुपयांची भरपाई मंजूर.
- एन. आय. अॅक्ट १३८ अंतर्गत १३ प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटली, २० लाख १७ हजार ६०० रुपयांची वसुली.
- रक्कम वसुलीच्या १ प्रकरणात १० लाख १९ हजार ८८१ रुपयांची वसुली.
- न्यायालयातील ५७ कबुली प्रकरणे तडजोडीने निकाली, ४१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल.

पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने लोकअदालत यशस्वी झाली. वकिल संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी, बँका, फायनान्स कंपन्या, पंचायत समिती, विज वितरण कंपनी यांच्या प्रतिनिधींसह सर्वांनी सक्रिय सहकार्य केले.

या लोकअदालतीमुळे प्रलंबित प्रकरणांचा बोजा कमी होण्यासोबतच पक्षकारांना दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांपासून मुक्तता मिळाली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल