**परांडा रोड भोसरे येथे कुटुंबावर कोयता व लोखंडी गजाने हल्ला; आई-मुलगा गंभीर जखमी**
**परांडा रोड भोसरे येथे कुटुंबावर कोयता व लोखंडी गजाने हल्ला; आई-मुलगा गंभीर जखमी**
**KDM NEWS प्रतिनिधी कुर्डूवाडी** माढा तालुक्यातील परांडा रोड भोसरे येथे घराजवळ फिरत असल्याच्या कारणावरुन दोघा तरुणांनी कुटुंबीयांवर कोयता व लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना १६ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात आई शोभा बबन भोसले व मुलगा रणजित बबन भोसले गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी रणजित बबन भोसले (वय २०, व्यवसाय - पान टपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो व त्याचा मित्र उदय यांच्याशी रात्री वॉकिंगवरुन परतत असताना दुर्योधन कंगड्या काळे व शुभम उर्फ नकल्या कंगड्या काळे (दोघेही रा. परांडा रोड भोसरे) यांनी त्यांना रोखले. "तुम्ही आमच्या घराजवळ का फिरता?" असे विचारुन शिवीगाळ व मारहाण केली.
रणजितने लगेच भाऊ ज्ञानेश्वर व आईला फोन करुन बोलावले. कुटुंबीय (ज्ञानेश्वर, शोभा, वहिनी आर्या, बहिण रेणुका) घटनास्थळी आल्यावर वाद वाढला. दोन्ही आरोपी घरी जाऊन शुभमने कोयता व दुर्योधनने लोखंडी गज घेऊन परतले. त्यांनी वहिनी आर्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आर्याने चप्पलने प्रतिकार केला.
कुटुंबीय घरी परतत असताना दोन्ही आरोपी व त्यांच्यासोबत दोन अनोळखी इसम त्यांच्या घरापर्यंत आले. शुभम उर्फ नकल्या कंगड्या काळे याने शोभा बबन भोसले यांच्या डोक्यात व उजव्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार केले. रणजित भांडण सोडवायला पुढे आल्यावर त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर व मनगटावर कोयत्याने गंभीर वार केले. दुर्योधन कंगड्या काळे याने ज्ञानेश्वर बबन भोसले यांच्या डाव्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केली. अनोळखी दोघांनी बहिण रेणुका व वहिनी आर्या यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली व "जिवच मारतो" अशी धमकी दिली.
जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय कुईवाडी येथे उपचारासाठी नेले असता त्यांना सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे रेफर करण्यात आले. उपचारानंतर रणजित, शोभा व ज्ञानेश्वर यांनी माढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी शुभम उर्फ नकल्या कंगड्या काळे, दुर्योधन कंगड्या काळे व दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या