**बार्शी तालुक्यात रस्त्यावर कोयता-कु-हाडीने हल्ला; मुलगा गंभीर जखमी, वडीलही मार खात चारीत ढकलले**

**बार्शी तालुक्यात रस्त्यावर कोयता-कु-हाडीने हल्ला; मुलगा गंभीर जखमी, वडीलही मार खात चारीत ढकलले** 

**KDM NEWS प्रतिनिधी नारी (बार्शी, सोलापूर) :** लग्नाच्या रागातून मेहुण्याच्या भावाने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर कोयत्याने डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून वडिलांनाही कोयत्याने मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत ढकलण्यात आले. ही घटना १९ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नारी गावाजवळील केशव घोगरे यांच्या शेताजवळील वळणाच्या रस्त्यावर घडली.

फिर्यादी राजेंद्र तुकाराम गवळी (वय ६५, रा. नारी, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा राहुल राजेंद्र गवळी याने दोन वर्षांपूर्वी गावातील अनिल शिंदे यांची मुलगी अस्मिता हिच्याशी पळून लग्न केले होते. हे लग्न अनिल शिंदे कुटुंबाला मान्य नव्हते. त्यामुळे अनिल शिंदे यांचा मुलगा ओम अनिल शिंदे याने राहुलला धमक्या दिल्या होत्या.

१९ मे रोजी रात्री राजेंद्र गवळी व त्यांचा मुलगा राहुल मोटारसायकलवर शेतातील जनावरांकडे जात असताना, ओम अनिल शिंदे, रोहन सुरेश कदम व आदर्श आप्पासाहेब कदम (सर्व रा. नारी) यांनी दुसऱ्या मोटारसायकलवरून पुढे आडवे येऊन त्यांना अडवले. तिघांनीही काही न बोलता हल्ला सुरू केला.

ओम शिंदे याने राहुलच्या डोक्यात कोयत्याने वार केला. रोहन कदम याने लोखंडी कु-हाडीने डोक्यात वार केला, तर आदर्श कदम याने राहुलच्या डाव्या हाताच्या दंडावर कोयत्याने वार केला. राहुल बेशुद्ध पडल्यावर ओमने “आता राहुल मेला आहे, आता या म्हाताऱ्याला मारा” असे म्हणत राजेंद्र गवळी यांच्यावर उलट्या कोयत्याने डाव्या मांडीवर व पाठीवर वार केले आणि त्यांना रस्त्याच्या कडेला चारीत ढकलले.

राजेंद्र गवळी यांनी पुतण्याला फोन करून मदत मागितली. नंतर राहुलला अभिजीत जाधव यांच्या चारचाकी गाडीतून बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुल यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी ओम अनिल शिंदे, रोहन सुरेश कदम व आदर्श आप्पासाहेब कदम यांच्याविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल