**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी
तालुक्यातील चिखर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन २००४-०५ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे रोजी चिखर्डे येथील संभाजीराजे भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने अवघा परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता.
सकाळी ९:३० वाजता ज्या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले, त्याच जि. प. शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर संभाजीराजे भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
**गुरुजनांचा सन्मान आणि मार्गदर्शन**
या सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ शिक्षक गुरव सर यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पाटील सर, पाचकवडे गुरुजी, पाटील गुरुजी, कासार सर, लाटे सर, भोसले सर व उकिरडे मॅडम उपस्थित होत्या. आपल्या लाडक्या शिक्षकांना पाहून अनेक विद्यार्थी भावूक झाले होते. उपस्थित शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या बॅचबद्दल गौरवोद्गार काढले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
**आठवणींचा 'फ्ॅशबॅक'**
कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय देऊन सध्याच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली. शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचा धाक आणि मैत्रीचे किस्से सांगताना अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्याचे महत्त्व आणि त्यातून मिळणारी सकारात्मकता यावर गणेश शिंदे, प्रफुल्ल पाटील व सरिता कोंढारे यांनी आपले विचार मांडले.
**मनोरंजनाची मेजवानी**
दुपारच्या सत्रात सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. भोजनानंतर कार्यक्रमात अधिक रंगत भरण्यासाठी उखाणे, गाण्यांच्या भेंड्या आणि संगीत खुर्ची यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वयाचे बंधन झुगारून सर्वजण या खेळांत हिरीरीने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मित्र-मैत्रिणींनी सामूहिक छायाचित्र (ग्रुप फोटो) काढून हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला. "हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक भेट नसून आमच्या आयुष्यातील संस्कारांची उजळणी आहे," अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अतिशय भावूक आणि आनंददायी वातावरणात या स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या