**बार्शी पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; हरवलेला मुलगा सुखरूप आईकडे**
**बार्शी पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; हरवलेला मुलगा सुखरूप आईकडे**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे एक पाच वर्षांचा चिमुरडा आईच्या मिठीत सुखरूप आला. घटना बार्शीच्या गजबजलेल्या बस स्थानकाची आहे.
सकाळी सुमारे ११ वाजता डायल ११२ वर एक कॉल आला की, बस स्थानकावर एक लहान मुलगा एकटा फिरत आहे आणि त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक दिसत नाही. डायल ११२ वरील कर्मचारी पोका/४१२ मोहन कदम यांनी तात्काळ माहिती घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना कळवली. त्यानुसार कदम हे लगेच बस स्थानकावर दाखल झाले आणि मुलाला ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलीस ठाण्यात आणले.
चौकशीत मुलाने आपले नाव अदिराज औदुंबर कुंभार असे सांगितले. पोलीसांनी मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअॅपद्वारे मुलाच्या आईचा मोबाईल नंबर मिळवला. आईला तात्काळ संपर्क साधून सांगण्यात आले की, त्यांचा मुलगा पोलीस ठाण्यात सुखरूप आहे.
मुलाची आई दीपाली औदुंबर कुंभार, रा. कसई, ता. तुळजापूर ही परंडा येथून बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्या. मुलाला पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या समक्ष मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी निरीक्षक कुकडे यांनी आईला मुलाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कामगिरीत पोका/१५३ राउत, पोका/४१२ मोहन कदम आणि पोका/९१८ वैभव भांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “प्रवास करताना लहान मुलांची विशेष काळजी घ्या. त्यांना एकटे सोडू नका. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ ११२ वर संपर्क साधा.”
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या या तत्पर आणि संवेदनशील कार्याची नागरिकांकडून प्रशंसा होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या