**अक्कलकोटमध्ये बोगस उडीद बियाण्यांची मोठी धडक कारवाई; ४८० बॅग जप्त, ८.४६ लाखांचा साठा**

**अक्कलकोटमध्ये बोगस उडीद बियाण्यांची मोठी धडक कारवाई; ४८० बॅग जप्त, ८.४६ लाखांचा साठा** 

**KDM NEWS प्रतिनिधी अक्कलकोट, २६ मे :** तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कृषी विभागाच्या जिल्हा स्तरीय भरारी पथकाने रात्री ८ वाजता अक्कलकोटमध्ये धडक कारवाई करत ४८० बॅग बोगस उडीद बियाणे जप्त केले. याची एकूण किंमत ८,४६,७२० रुपये इतकी आहे.

स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या NUL 7 (विश्वास) या उडीद वाणाची हुबेहूब नक्कल करून बनावट बियाणे तयार केल्याचे समोर आले. ४८ बॅग विक्रीसाठी आणलेल्या अवस्थेत तर ४३२ बॅग आबा कृषी सेवा केंद्र, अक्कलकोट येथील गोदामात ठेवलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आल्या. प्रत्येक बॅग ५ किलोची होती.

या कारवाईचे नेतृत्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्रचार्य भोसले व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पथकात तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी.बी. बाबर, अशोक कांबळे व निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर सहभागी होते.

जप्त केलेल्या बियाण्यांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात विक्रेत्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट बियाण्यांमुळे शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक टळली असून, शेतकऱ्यांमध्ये या कारवाईचे समाधान व्यक्त केले जात आहे.

कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कठोर धोरण अवलंबले असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना प्रमाणित कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल