**महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय: तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच सोडवावेत**

**महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय: तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच सोडवावेत** 

**KDM NEWS प्रतिनिधी करमाळा (सोलापूर) :** जनतेला मंत्रालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन समस्या सोडवण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात नियमित भेटी देऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

करमाळा येथे सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी घरकुल बांधकामासाठी वाळूचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, रश्मीताई बागल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सह दुय्यम निबंधक एस. एस. कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री बावनकुळे म्हणाले, “गृहखाते जनतेच्या जीवाचे रक्षण करते तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करते. या सरकारचे धोरणच जनसेवेला प्राधान्य देणारे आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव या उपक्रमातून वगळले जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी.”

**मोजणी प्रक्रिया गतिमान करा**
मंत्री बावनकुळे यांनी मोजणी प्रक्रियेवर विशेष भर दिला. “पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करावी. पानंद रस्ते, वहिवाटीचे रस्ते शोधून जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून मोजणी करावी. रस्त्याच्या कडेला झाडे लावावीत, जेणेकरून रस्ते बंद होणार नाहीत. कोणी रस्ता अडवला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

**शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आश्वासन**
शेतकऱ्यांच्या विकासाबाबत बोलताना मंत्री म्हणाले, “२४ तास वीज आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. पुढील पाच वर्षांत सर्व शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते बारमाही वापरता येतील असे करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे.”

**अनधिकृत घरे कायमस्वरूपी मालकीची**
राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, अनधिकृत रहिवासी घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करण्यात येणार आहेत. रजिस्ट्रीचा खर्चही शासन उचलणार आहे, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.

**निवेदन तीन दिवसांत निकाली**
नागरिकांनी दिलेल्या नियमांनुसार असलेल्या निवेदनांवर तीन दिवसांत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊन मंत्री म्हणाले, “जनतेची हेळसांड होऊ नये, प्रश्न तात्काळ सोडवले जावेत. भ्रष्टाचाराची कोणतीही तक्रार येऊ नये, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.” देवस्थानाच्या जमिनींबाबत कायद्यात सुधारणा करण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महसूल विभागातील विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल