**बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना; अजित पवार अपघातस्थळापासून अवघ्या १ किमी अंतरावर शिकाऊ विमान कोसळलं**
**बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना; अजित पवार अपघातस्थळापासून अवघ्या १ किमी अंतरावर शिकाऊ विमान कोसळलं**
**KDM NEWS बारामती (प्रतिनिधी):** महाराष्ट्रातील बारामती तालुक्यात आज सकाळी पुन्हा एका भीषण विमान दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जानेवारीतील दुर्दैवी अपघातस्थळापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड एव्हिएशनच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला.
सकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास दोन सीटर ट्रेनिंग एअरक्राफ्टने तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला. विमान उंची कमी असताना एका लाइट पोलला धक्का बसल्याने ते कोसळले. सुदैवाने या अपघातात विमानातील एकमेव वैमानिक जखमी झाले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. वैमानिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या दुर्घटनेमुळे बारामती विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमानाचे तुकडे परिसरात विखुरलेले असून, अपघाताचे कारण तपासण्यासाठी पोलिस आणि विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे.
**पार्श्वभूमी:**
यापूर्वी २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळच VSR Ventures च्या लिअरजेट ४५ विमानाचा अपघात झाला होता. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. आजची दुर्घटना त्याच परिसरात घडली असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीत रेडबर्ड आणि कार्वर एव्हिएशन या दोन प्रमुख संस्था शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देतात. या संस्थांमधील सुरक्षा उपायांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान मोठ्या आवाजात घिरट्या घालत आले आणि अचानक खाली कोसळले. अपघातानंतर लगेचच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या