**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**
**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**
**KDM NEWS बार्शी: प्रतिनिधी**
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ३० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बार्शीच्या कुमारी प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत महसूल विभागात 'महसूल सहाय्यक' (लिपिक-टंकलेखक) पदी आपली मोहोर उमटवली आहे.
जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही आव्हानावर मात करू शकते, हे बार्शीच्या प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये प्रियांका यांनी 'महसूल सहाय्यक' पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे बिडवे कुटुंबासह संपूर्ण बार्शी आणि परंडा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
२६१ गुणांसह 'ओपन' प्रवर्गातून यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ११८/२०२५ नुसार ही परीक्षा घेण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत प्रियांका यांनी आपले कौशल्य सिद्ध करताना २६१ गुण पटकावले. विशेष म्हणजे, त्यांनी 'ओपन-फीमेल' या प्रवर्गातून हे यश संपादन केले आहे. त्यांची निवड मुंबईबाहेरील क्षेत्रासाठी असलेल्या 'अर्थ व सांख्यिकी संचालनालय' (Directorate of Economics and Statistics) अंतर्गत करण्यात आली आहे.
घरूनच केला अभ्यासाचा 'मंत्र' सिद्ध
प्रियांका यांचे मूळ गाव परंडा (जि. धाराशिव) तालुक्यातील हिंगणगाव खुर्द हे आहे. मात्र, त्यांचे कुटुंबीय सध्या बार्शी येथे राहतात' या राहत्या घरीच कोणतीही महागडी शिकवणी न लावता, प्रियांका यांनी स्पर्धा परीक्षेचा डोंगर पोखरला. केवळ योग्य नियोजन आणि स्वयंअध्ययनाच्या (Self-study) बळावर त्यांनी हे यश मिळवले, जे आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कुटुंबाच्या पाठबळाला मिळाले फळ
प्रियांका यांचे वडील भाऊसाहेब बिडवे यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. ग्रामीण भागातून येऊन, प्रतिकूल परिस्थितीतही प्रियांका हिने घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल बिडवे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून प्रियांका यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या