**नीट पेपरफुटी प्रकरण : सीबीआय चौकशीचे तपशील; नांदेड कदम कुटुंबीयांची ८ तास कसून चौकशी, NTA पॅनलमधील ‘इनसाइडर्स’ मुख्य सूत्रधार**
**नीट पेपरफुटी प्रकरण : सीबीआय चौकशीचे तपशील; नांदेड कदम कुटुंबीयांची ८ तास कसून चौकशी, NTA पॅनलमधील ‘इनसाइडर्स’ मुख्य सूत्रधार**
**KDM NEWS प्रतिनिधी नांदेड/मुंबई ** : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास वेगाने पुढे सरकला असून, महाराष्ट्रातील नांदेडसह पुणे, लातूर, नाशिकसह राजस्थान आणि हरियाणात छापे आणि चौकशा सुरू आहेत. परीक्षा रद्द झाल्यानंतर १२ मे २०२६ रोजी सीबीआयने एफआयआर दाखल करत विशेष पथके तयार केली. आतापर्यंत नऊहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून, डिजिटल पुरावे, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि कॉल रेकॉर्ड्सवर आधारित तपास सुरू आहे.
**नांदेडमध्ये सीबीआय कारवाई**
शनिवारी (१६ मे) सीबीआय पथकाने विद्युतनगर भागातील आशा रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये अश्विनी भाऊराव कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. सकाळी सुरू झालेली कारवाई तब्बल ८ तासांहून अधिक काळ चालली. कुटुंबातील पती-पत्नी आणि विद्यार्थिनी मुलीची वेगवेगळ्या खोलीत बसवून कसून चौकशी करण्यात आली.
कदम कुटुंबीयांवर मुलीसाठी ५ लाख रुपयांत पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. नांदेडमध्ये नीट तयारी करताना मुलीला केवळ १०० ते १२० गुण मिळत होते. मात्र, परीक्षेच्या १५ दिवस आधी पुण्यातील सराव परीक्षेत ५६० गुण मिळाल्याने संशय बळावला. सीबीआयने आर्थिक व्यवहार, मध्यस्थ, पैशाचा स्रोत, व्हॉट्सअॅप-टेलिग्राम चॅट्स आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची बारकाईने तपासणी केली. घरातून महत्त्वाचे कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. कुटुंबीयांना पुणे सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
सीबीआय पथक शुक्रवारी लातूरमध्ये कोचिंग क्लासशी संबंधित ड्रायव्हर आणि व्यक्तींची चौकशी करून थेट नांदेड गाठले होते. लातूर-नांदेड-पुणे कनेक्शन तपासात महत्त्वाचे ठरत आहे.
**NTA पॅनलमधील इनसाइडर्सची भूमिका**
सीबीआय तपासात NTA प्रश्नपत्रिका पॅनल सदस्य मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहेत:
- **प्रा. पी.व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र, पुणे)** : ‘किंगपिन’ म्हणून ओळख. NTA पॅनल सदस्य म्हणून प्रश्नपत्रिका उपलब्ध असताना गळती केल्याचा आरोप. पुण्यातील घरगुती विशेष क्लासेसद्वारे ‘गेस पेपर’ डिक्टेट केल्याचे तपासात उघड. लातूरचे मूळ रहिवासी.
- **मनीषा गुरुनाथ मांढरे (वनस्पतिशास्त्र)** : NTA पॅनल सदस्य आणि अनुवादक. जीवशास्त्र प्रश्नांची गळती केल्याचा मुख्य आरोप. निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवल्याचे सीबीआयचे म्हणणे.
सीबीआयने संपूर्ण NTA पॅनल, प्रश्न सेटर्स आणि अनुवादकांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू केला आहे. ‘पूर्ण समिती स्कॅनरखाली’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.
**अटक आणि इतर छापे**
- राजस्थानातील बिवल कुटुंबीय (दिनेश, मंगीलाल, विकास बिवल) — १०-२५ लाखांत पेपर खरेदीचा आरोप.
- नाशिकचे शुभम खैरनार — वितरण साखळीतील महत्त्वाची कडी.
- अहमदनगरचे डॉ. धनंजय लोकहंडे आणि पुण्यातील मनीषा वाघमारे.
- हरियाणातील यश यादव.
पेपर लीकसाठी ५ ते २५ लाखांची ‘फी’ आकारली जात होती. गेस पेपरमधील १२० हून अधिक प्रश्न नेमके जुळल्याने प्रकरण उघडकीस आले. PDF स्वरूपात टेलिग्रामद्वारे वितरण झाल्याचे तपासात समोर आले.
**तपासाची दिशा**
सीबीआय आता आंतरराज्यीय रॅकेट, कोचिंग संस्था, मध्यस्थ, पालक आणि NTA अधिकाऱ्यांच्या संभाव्य सहभागाचा तपास करत आहे. फॉरेन्सिक विश्लेषण, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि डिजिटल फुटप्रिंट्सवर भर दिला जात आहे. तपास पुणे, दिल्ली, जयपूरसह महाराष्ट्रात सक्रिय आहे. आणखी अटक आणि छाप्यांची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करून २१ जूनला री-एक्झाम घेण्यात येणार आहे. सीबीआय सूत्रांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्रत्येकाला कायद्याच्या कठोर शिक्षेचा सामना करावा लागेल. तपास सर्वांगीण आणि वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या