**बार्शी हादरली! अपघातावेळी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद; मोफत नसबंदीसाठी गरिबांकडून २,००0 रुपयांची वसुली!**

**बार्शी हादरली! अपघातावेळी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद; मोफत नसबंदीसाठी गरिबांकडून २,००0 रुपयांची वसुली!** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर):** बार्शी तालुक्यातील पानगाव येथील आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र) सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहे. १८ जून २०२६ रोजी अपघातातील गंभीर जखमी रुग्णांना उपचारासाठी नेले असता दवाखाना कुलूपबंद आढळला, तर दुसऱ्या दिवशी १९ जून रोजी मोफत नसबंदी शस्त्रक्रियेसाठी गरिबांकडून १,००० ते २,००० रुपये उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. या घटनांमुळे स्थानिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.

१८ जून रोजी पानगाव परिसरात भीषण अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या जखमींना तातडीने पानगाव आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, केंद्र बंद होते. एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपलब्ध नव्हता. रुग्णांचे प्राण टांगणीला लागल्याची स्थिती निर्माण झाली. या निष्काळजीपणाबाबत बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता बांगरे यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील आणि डॉ. ऋतुजा खटाळ यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.

याच धक्कादायक प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी नसबंदी शिबिरात भ्रष्टाचार उघडकीस आला. शासनाने १०० टक्के मोफत घोषित केलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून पैसे उकळण्यात आल्याचे आरोप आहेत. रुग्ण ज्योती शिंगण यांच्या पतीला २,००० रुपये फोन-पे द्वारे 'डंबरे' नावाच्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करावे लागले. नंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढून घेण्यात आली. याशिवाय, आशा वर्कर दीदी पवार यांच्या शस्त्रक्रियेसाठी १,००० रुपये उकळल्याची तक्रार त्यांच्या पती मच्छिंद्र पवार यांनी केली आहे.

सर्वांत गंभीर बाब म्हणजे, एलएचव्ही परिचारिका मिनाक्षी माने यांनी लेखी जबाबात नसबंदी रुग्णांकडून वसूल केलेली रक्कम थेट सर्जन डॉ. खारे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे कबूल केले आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमधील संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार चालू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आरोग्य विभागाने अद्याप फक्त नोटीस देऊन भागवले आहे. मात्र, लेखी कबुली आणि रुग्णांच्या तक्रारी असताना फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्ते यावर तीव्र आंदोलनाची तयारी दर्शवत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची आशा असते. मात्र, पानगाव प्रकरणाने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल