**बार्शी : दगडखाणीतील अवैध खोदकामाचे फोटो तहसीलदारांकडे पाठवल्याने पत्रकारावर हल्ला**
**बार्शी : दगडखाणीतील अवैध खोदकामाचे फोटो तहसीलदारांकडे पाठवल्याने पत्रकारावर हल्ला**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी , १ जून २०२६ :** बार्शी शहरातील शिवाजी आखाडा परिसरात राहणारे दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रशांत चंद्रकांत खराडे (४६) यांना रविवारी दुपारी अवैध दगडखाणीतील खोदकामाचे फोटो काढून तहसीलदारांकडे पाठवल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ३१ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास खराडे यांच्या घरासमोरच्या पत्राशेडमध्ये सचिन उर्फ बाळू जाधव (रा. सुभाष नगर, बार्शी) याने दोन साथीदारांसह येऊन खराडे यांना विचारले की, "सुनील भराडीया यांच्या खाणीचे फोटो का काढले आणि ते तहसीलदार साहेबांना का पाठवले?" असा जाब विचारून त्यांची गच्ची धरून हाताने मारहाण केली व शिवीगाळ केली.
खराडे यांची पत्नी रुपाली आणि भांडी धुण्यासाठी आलेल्या मीरा बगाडे (रा. लहुजी चौक) व सुनिता पेटणे (रा. टिळक चौक) यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार खराडे यांनी घटनेचा तक्रार अहवाल पोलीस ठाण्यात दिला असून, त्यात त्यांनी स्वतः, पत्नी व दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या