**दहशत माजवणारा गावगुंड संजय आरगडे बार्शी तालुका पोलिसांनी केला जेरबंद**
**दहशत माजवणारा गावगुंड संजय आरगडे बार्शी तालुका पोलिसांनी केला जेरबंद**
**बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहर व तालुक्यात जमिनी बळकावणे, शेतकऱ्यांना मारहाण करणे, सावकारकी करणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवण्याच्या आरोपात ख्यातनाम गुंड संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) यास बार्शी तालुका पोलीसांनी जेरबंद केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आरगडे व त्याच्या साथीदारांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. १७१/२०२६ दाखल करण्यात आला. त्यात भा.दं.सं. कलम १०९, ११९, ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) यांचा समावेश आहे. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना काही तासांतच पोलिसांनी त्यास अटक केली.
संजय आरगडेवर यापूर्वी १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पूर्वी तडीपारही करण्यात आले होते. तो बार्शी परिसरात गोरगरीब शेतकरी, व्यवसायिक, महिलांना त्रास देणे, सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे वारंवार गुन्हे करत होता.
**पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई**
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे व त्यांच्या पथकाने (पोहेकॉ मंगरुळे, बोबडे, खांडेकर, धनराज केकाण, ओमप्रकाश दासरे, राहूल बोंदर, गोविंद बचुटे, सुरेश बिरकले, शिवशंकर खराडे) ही यशस्वी कारवाई केली.
**जनतेला आवाहन**
बार्शी तालुका पोलीस ठाणेने जनतेला आवाहन केले आहे की, संजय आरगडे व त्याच्या साथीदारांनी यापूर्वी ज्यांना त्रास दिला असेल किंवा त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवायची असेल तर न घाबरता थेट पोलीस ठाण्यात यावे. तसेच परिसरात विनापरवाना सावकारकी, दूध-खाद्यपदार्थात भेसळ, महिलांना त्रास देणारे आणि दहशत माजवणारे गुन्हेगारांबाबत माहिती देण्यासाठी बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
टिप्पण्या