**मोहोळ तालुक्यातील दूध डेअरींवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १३ नमुने जप्त**
**मोहोळ तालुक्यातील दूध डेअरींवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १३ नमुने जप्त**
**KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ (सोलापूर):** अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहोळ तालुक्यातील दूध उत्पादक आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. यात सहा डेअरींमधून १३ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे विभागीय सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गुरुवारी (४ जून २०२६) सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने मोहोळ तालुक्यातील **चंद्रमौली एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे** आणि **तांबोळे** या ठिकाणच्या सहा दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी केली. पथकात अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, डॉ. उमेश भुसे, डॉ. मंगेश लवटे, कि. ध. देशमुख आणि सु. द. जिंतूरकर यांचा समावेश होता.
या मोहिमेत मोहोळ तालुक्यात शंकास्पदरीत्या मोठ्या प्रमाणात दूध संकलन होणे आणि कृत्रिम दुध निर्मितीची शक्यता लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली. तपासणीत घेतलेले १३ नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
**मागील कारवायांचा आढावा:**
सन २०२१ ते २०२६ या कालावधीत मोहोळ तालुक्यातील १३ दूध आस्थापनांची तपासणी झाली. यातून एकूण २३ नमुने घेण्यात आले. त्यापैकी १० नमुने प्रमाणित दर्जाचे आढळले, तर उर्वरित १३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नवीन नमुन्यांचे अहवालही प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सहाय्यक आयुक्त सा. ए. देसाई यांनी सांगितले की, “मोहोळ तालुक्यातील दूध संकलन केंद्रांवरील नमुने तपासणीसाठी घेतले असून, अहवालानुसार अन्न सुरक्षा कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल.”
ही कारवाई नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यव्यापी मोहिमेचा भाग आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासन कडक नजर ठेवून आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या