**गोटपॉक्स लसीकरण मोहीम सुरू; ३७.५२ लाख डोस पहिल्या टप्प्यात वाटप**
**गोटपॉक्स लसीकरण मोहीम सुरू; ३७.५२ लाख डोस पहिल्या टप्प्यात वाटप**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ११ जून :** राज्यातील गायी-म्हशींसह गोवंशीय पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून संरक्षण देण्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात गोटपॉक्स लसीचे उत्पादन पुणे येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेत सुरू झाले आहे. २१व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय पशुधन संख्या लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजे ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे नियोजनबद्ध वाटप सुरू करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी या मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले आहे. “लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारापासून पशुधनाचे संरक्षण हे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुपालकांनीही पूर्ण सहकार्य करावे,” असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.
**प्राधान्य आणि सूचना**
पुणे येथील संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यात मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
- पुरवठा झालेल्या लसीची शीत साखळी (कोल्ड चेन) कुठेही खंडित होणार नाही याची काटेकोर दक्षता.
- प्राप्त लस ताबडतोब क्षेत्रात पोहोचवणे.
- अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादक क्षमता असलेल्या पशुंना प्राधान्याने लसीकरण.
- लसीकरणाचे दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात सकाळी ११ वाजेपर्यंत विभागीय स्तरावर सादर करणे.
**हॉटस्पॉट भागांवर विशेष लक्ष**
गेल्या वर्षी लम्पीचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये प्राधान्याने मोहीम राबवावी. जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि सेवादात्यांचे सक्रिय सहकार्य घेण्यात यावे, असे विभागाने जिल्हा यंत्रणेला कळवले आहे.
लम्पी चर्मरोग हा विषाणूजन्य आजार असून, त्यापासून बचाव करण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या पशुधनाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. पशुपालकांनी विभागास सहकार्य करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या