**बार्शीत गुटखा माफियाचा धुव्वा! १५ प्रकारचा प्रतिबंधित साठा जप्त, दुकान सील**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (जि. सोलापूर)** : बार्शी शहरातील हिरेमठ हॉस्पिटलजवळ, आगळगाव रोडवरील ‘मे. त्रिमूर्ती पान शॉप’वर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या गोपनीय माहितीवरून बार्शी शहर पोलिसांनी छापा टाकला. यात १५ प्रकारचे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या पथकाने १ जून रोजी ही कारवाई केली. दुकान मालक संकेत भगवान लांडगे (वय ३२, रा. सुभाष नगर, बार्शी) यांच्याकडून सुपारी, सुगंधित तंबाखू, कात, चुना यांचे मिश्रण असलेले गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी आढळले.
अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांचे अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी रात्री १०.४५ वाजता मुद्देमालाची पाहणी केली. त्यात महाराष्ट्र शासनाच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेनुसार (क्र. असुमाअ/४११/२०२५/७) प्रतिबंधित पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी आहे.
पोलिसांनी प्रत्येक प्रकारचे नमुने तपासणीसाठी काढले व उर्वरित साठा जप्त केला. दुकान पुन्हा अवैध व्यवहारासाठी वापरले जाऊ नये म्हणून सील करण्यात आले. पुरवठादाराची माहिती आरोपीने दिली नाही.
**कायदेशीर कारवाई**
आरोपी संकेत लांडगे यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम २६, २७, ३० सह नियमन २०११ आणि भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५ व १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुरवठादार व संपूर्ण साखळी उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या कारवाईत निर्भय पथकाचे बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडुळे यांचा समावेश होता.
पदभार स्वीकारल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वात बार्शी व परिसरात अवैध गुटखा, दारू आणि मटका अड्ड्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
टिप्पण्या